मुंबई : मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी होत असलेले प्रयत्न अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. त्यासोबतच त्या त्या काळातील व्यवस्थेला अनुरूप भाषा बदलली पाहिजे. असे बदल ना झाल्यास भाषा हळहळू व्यवहारातून बाहेर जाण्याची भीती असते. त्यामुळे व्यवहार कुशल भाषा असणेही महत्त्वाचे आहे. मराठीला नव्या पिढीच्या अभिव्यक्तीची भाषा बनवावी लागेल. उपभाषा आणि बोलींनी तिचे सौंदर्य वाढले. त्यामुळे ज्याला जी समजते, त्याप्रकारच्या भाषेमध्ये मराठी कशी आणता येईल, याचा प्रयत्न करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केली.
मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जगातील दहावी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी 25 टक्के ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. मराठी भाषेत होणारी साहित्य संमेलने ही मराठी भाषेची वेगळी ओळख आहे. मराठी भाषेत 200 हून अधिक साहित्य संमेलने होतात. या संमेलनांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते तसेच विविध बोलींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मराठी ही एकमेव भाषा आहे. मराठी भाषेचे हे वेगळेपण आहे.
मराठी भाषेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तर, मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र शासन करत राहणार, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी विशेष टपाल तिकीट आणि विशेष आवरणाचे अनावरण, विविध ग्रथांचे, पुस्तकांचे, विशेष अंकाचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आजपासून 9 ऑक्टोबरपर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे.
यावेळी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्हे, राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते, अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर उपस्थित होते.
विभाग कसा चालवू नये असेही पुस्तक काढा
मराठी भाषा विभाग कसा चालतो, हे पुस्तक विभागाने प्रकाशित केले. हा विभाग कसा चालवू नये असेही पुस्तक प्रकाशित करा. कारण मध्यंतरी अडीच वर्षाच्या (ठाकरे सरकारच्या) काळात ज्या पद्धतीने कारभार चालला तो पाहिल्यास विभाग कसा चालवू नये असेही पुस्तक काढावे लागेल. म्हणजे भविष्यात त्याचाही उपयोग होईल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.