टिपूच्या पाठीराख्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत थेट इशारा 
मुंबई

CM Devendra Fadnavis | टिपूच्या पाठीराख्यांना सोडणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विधानसभेत थेट इशारा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : या देशाचा खरा इतिहास 70 वर्षे जाणीवपूर्वक लपवून ठेवण्यात आला. जर योग्य वेळी खरा आणि वस्तुनिष्ठ इतिहास शिकवला गेला असता, तर आज या देशातील एकाही मुसलमानाने क्रूरकर्मा औरंगजेबाला आणि टिपू सुलतानला आपला हिरो मानले नसते. 75 हजार हिंदूंची आणि 33 हजार नायरांची कत्तल टिपू सुलतानने केली, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. जे लोक देशाच्या विरोधकांना आणि आक्रमणकार्‍यांना हिरो मानतील, त्यांना आम्ही सोडणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टिपू सुलतानवरून राजकारण करणार्‍या विरोधकांना गुरुवारी विधानसभेत फटकारले. तसेच महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगताना हिंदी सक्तीच्या निर्णयावर तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही असल्याचे स्पष्ट केले.

आमदार विजय वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या टिपू सुलतानच्या मुद्द्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, टिपू सुलतान चांगले होते की वाईट यावर आमचा आक्षेप नाही. मात्र, ज्यावेळी टिपू सुलतान हे छत्रपती शिवरायांएवढे मोठे राजे होते, असे कुणीतरी म्हणतो, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली, त्यात वर्षानुवर्षे आम्हाला टिपू सुलतान हे महान राजे होते हेच शिकवण्यात आले. मात्र, 75 हजार हिंदूंची आणि 33 हजार नायरांची कत्तल टिपू सुलतानने केली, हे आम्हाला कधीच शिकवले नाही. आता खरा इतिहास सापडतो आहे, असेही ते म्हणाले.

या देशात सरकारने 70 वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकात मुघल साम्राज्याला 17 पाने दिली आणि छत्रपती शिवरायांना एक परिच्छेद दिला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने एनसीईआरटीमध्ये छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांच्या इतिहासाला 20 पाने दिली, असे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिले.

राष्ट्रभक्त मुस्लिमांबद्दल आक्षेप नाही : मुख्यमंत्री

या देशात?अनेक राष्ट्रभक्त मुस्लिम आहेत. त्यांच्याबद्दल आमचा कसलाही आक्षेप नाही. मात्र, जे लोक देशाच्या विरोधातील लोकांना आपला हिरो म्हणतील त्यांच्याविरुद्ध आम्ही लढत राहू, असा?इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT