CM Devendra Fadnavis pudhari
मुंबई

CM Devendra Fadnavis | विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; स्पर्धा परीक्षेच्या सर्वंकष सुधारणांचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीच्या गैरप्रकारात एमपीएससीतील किंवा बाहेरील ज्या व्यक्तींचा सहभाग असेल त्या सर्वांना कठोर शिक्षा केली जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्यांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यांच्या कष्टाचे चीज होईल, अशाच सुधारणा परीक्षा पद्धतीत केल्या जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

एमपीएससी परीक्षा पद्धती संदर्भात स्पर्धा परीक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे परीक्षा पद्धतीतील सुधारणांसंदर्भात मागण्या केल्या. राज्य सरकारने एमपीएससी स्पर्धा परीक्षेतील सुधारणांसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे आदेश शनिवारीच जारी केले आहेत.

याचा संदर्भ देत फडणवीस म्हणाले की, पारदर्शी पद्धती विकसित करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे. ही प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती राज्यभर जाऊन विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत करणार आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही फडणवीस म्हणाले.

शिष्टमंडळात शिक्षक सचिन ढवळे, यशवंत सोलाट, धनंजय मते, गणेश कड, उमेश कुदळे, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते निखिल पाटील यांच्यासह स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT