Devendra Fadnavis (Pudhari Photo)
मुंबई

Devendra Fadnavis| पुरावे सापडल्यास अधिकारी, राजकीय व्यक्तींनाही सोडणार नाही ः मुख्यमंत्री

विधानसभेत ग्वाही; भोंदू खरातवर आतापर्यंत आठ गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : खरातप्रकरणी डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. ज्यांच्याविरुद्ध पुरावे मिळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींचा जरी संबंध आढळून आला तर त्यांनाही सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

या प्रकरणात जर कोणी पोलिसांवर दबाव आणला किंवा हस्तक्षेप केला तर त्यांनाही पाठीशी घालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस यांनी अशोक खरातविषयी मंगळवारी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. अनेक राजकारण्यांचे, आयपीएस, आयएएस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे खरातसोबत फोटो असल्याने तपासात हस्तक्षेप केला जाण्याची भीती विरोधकांनी व्यक्त केली. तसेच, निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत तपास करा, अशी मागणी केली. ती त्यांनी फेटाळून लावली. आपण राजकारणात आहोत, कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरून तो आरोपी होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भोंदूबाबा खरातच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या मोबाईलमधला तसेच डिलिट केलेला डेटाही मिळविण्याचे काम सुरू आहे. यातून त्याला कुणी संपर्क केला आहे का? कुणी मॅसेज केले आहेत? याची माहिती समोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैवीशक्तीचा खोटा कांगावा

खरात याने स्वतःकडे दैवीशक्ती असल्याचा खोटा दावा करत अनेक महिलांचा विश्वास संपादन केला होता. धार्मिक विधी, मंत्र-तंत्र आणि अंधश्रद्धेचा आधार घेत महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार, अश्लील कृत्ये केल्याचे तपासातून उघड झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी खरात याच्या मालमत्तेची जंत्री सभागृहात वाचून दाखवली. या सर्व मालमत्तांचा आणि आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, आयकर विभागाशी समन्वय साधण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकूणच प्रकरणाची खोली पाहता, खरात देश सोडून पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन 10 मार्च रोजी ‌‘लूकआऊट‌’ नोटीस जारी करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

व्हिडीओतून उघड झाले धक्कादायक प्रकार

याप्रकरणी राजेंद्र जासूद याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डी येथे एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, नीरज जाधव याने एआय जनरेटेड फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप या गुन्ह्यात होता. या गुन्ह्यांची दखल घेत, संबंधित फोटो त्याने नंतर डिलिट केला असला, तरी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, तक्रारदार महिलेने तपासासाठी मोबाईल सादर न केल्याने तपासात अडचणी येत होत्या. याबाबत सुरक्षेची हमी देत विश्वास दिल्यामुळे धक्कादायक व्हिडीओ बाहेर आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

भोंदूगिरी करून महिलांचे शारीरिक शोषण

तपासावेळी योगेश भालेराव याने पोलिसांना काही व्हिडीओ दाखवले. त्यामध्ये आठ महिलांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये अशोक खरातने भोंदूगिरी, जादूटोणा करून महिलांचे शारीरिक शोषण केल्याचे दिसून आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT