मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे तीन प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इको-सिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आय-हब क्वांटम टेक्नॉलॉजी फाऊंडेशनच्या क्वांटम टेक्नॉलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोप सत्राला मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या बळावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे.
महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इको-सिस्टीम उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील टप्प्यात ५०० प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान ५ हजारांहून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांमध्ये क्वांटम क्षेत्रातील क्षमता विकसित होत आहेत. या सर्व संस्थांची ताकद एकत्रित करून राज्याचे क्वांटम मिशन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.