मुंबई / ठाणे : मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबई-ठाण्यात दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होत व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाणे परिसरातील गोविंदांना भेटी देत गोविंदांचा उत्साह वाढवला. फडणवीस यांनी प्रथम वरळी येथील जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवाला भेट दिली. व्यासपीठावरून त्यांनी राजकीय भाष्य न करता सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मात्र फडणवीस म्हणाले, यंदा महानगरपालिकेत परिवर्तन अटळ असून महापालिकेतील पापाची हंडी आम्ही फोडली आहे. आता तेथे नवीन विकासाची हंडी लागेल. त्या विकासाच्या हंडीतील लोणी जनसामान्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
इतकी वर्षे लोणी कुठे जात होते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, कुठे जात होते, ते तुम्हाला माहीत आहे. तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहात. पण लोणी कोणी खाल्ले हे जनतेला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी हजेरी लावली. आनंद दिघे यांनी सुरू केलेली ही हंडी ऐतिहासिक हंडी आहे. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा खर्या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच चालवत असल्याचे प्रशस्तीपत्र मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
यापूर्वी विशिष्ट लोकांपर्यंतच लोणी जात होते, मात्र आता सर्वसामान्य लोकांपर्यंत लोणी पोहोचेल, असा विरोधकांना टोला लगावत मुख्यमंत्री म्हणाले, ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक जिंकली त्याच पद्धतीने आता मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार आहोत.
तीन वर्षांपूर्वी आम्ही विकासाचे थर लावले आणि विकासाची हंडी फोडली. विरोधकांनी विकास विरोधी थर लावले, मात्र त्यांची ही हंडी जनतेने फोडून टाकली,अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. विधानसभेची हंडी महायुती फोडणार असे मी म्हणालो होतो आणि आम्ही 232 थर लावून आमदार निवडून आणले आणि विजयाची हंडी फोडली. पेहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय लष्कराने फोडली. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. आता पाकिस्तानने पुन्हा थर लावण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची कायमची हंडी फोडून टाकायची असल्याचेही शिंदे म्हणाले.
दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधने होती. सगळी बंधने एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना हटवण्यात आली. आता आमचे सरकार असून सगळी बंधने हटवण्यात आलेली असून राज्यभरात प्रचंड उत्साह सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याच उत्साहात दंहीहंडी साजरी होत आहे. परंतु रात्रीपासून पाऊस पडतो आहे, आजही पावसाचा अंदाज आहे. मात्र कितीही पाऊस पडला, तरी गोविंदांच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे. अशा पावसातही दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.