मुंबई

CM Devendra Fadnavis | मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करणारच!

अटल सुशासन संमेलनात मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : जेव्हा महायुतीचा भगवा मुंबई महानगरपालिकेवर फडकेल, त्या दिवशीच अटलजींना खरी श्रद्धांजली अर्पण होईल. आज अटलजींना आदरांजली अर्पण केली जात असली, तरी खरी आदरांजली 16 जानेवारी रोजी महापालिकेच्या निकाला दिवशी वाहिली जाईल, असा संकल्प व्यक्त करीत मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता स्थापन करण्याचा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अटल सुशासन संमेलनात कार्यकर्त्यांना ते संबोधित करत होते.

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन करून ‘अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा’ हे प्रत्यक्षात सिद्ध करण्याचा संकल्प आहे. पारदर्शकता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांवर आधारित कारभारच मुंबई महानगरपालिकेत रुजवला जावा, या उद्देशाने ही निवडणूक लढवली जात आहे. मुंबई महापालिकेत 227 जागा आहेत. आपला मित्रपक्ष शिवसेना आहे. त्यांच्याशी महायुती करणार आहोत. काही जागा ते लढतील, काही आपण लढू. अनेकांच्या इच्छा-अपेक्षा, आकांक्षा असू शकतात. अनेक प्रभागांत अनेक चांगले कार्यकर्ते आहेत; पण शेवटी काही लोकांनाच आपण तिकीट देऊ शकणार आहोत. आज आपण संकल्प करण्याची आवश्यकता आहे. तिकीट मिळो अथवा न मिळो, आपण अटलजींचे स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरायचे आहे, असे सांगत फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युती होण्याचे स्पष्ट संकेत दिले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा कामगिरी महत्त्वाची ठरेल. महायुतीच्या विकासकामांवर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. कोणत्याही पक्षाला निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते, तेच आज काही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी दोन-चार पक्ष किंवा नेते सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचे काम पाहूनच मतदान करतील, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबईत अटलजींच्या स्मृतींना साजेसे भव्य स्मारक येत्या काळात साकारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सत्तेची नव्हे, विचारांची लढाई

फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, मुंबईत महापौर कोणाला करायचे यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणार्‍यांना पुन्हा संधी द्यायची आहे. या निवडणुकीत भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही. आगामी महापालिका निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT