मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते, अशी सूत्रांची माहिती होती. त्यानंतर चाकणकर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला देवगिरी बंगल्यावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवारांकडे त्यांनी पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात याला पाठीशी घालणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना या पदाचा तातडीने राजीनामा द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले होते.
अशोक खरात याला महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणात अटक करण्यात आले असून, रूपाली चाकणकर यांनी खरातला त्याच्या दुष्कृत्यात पाठीशी घातल्याचे आरोप शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर तांत्रिक पूजेसाठी स्वतःचे बोट कापून घेतल्याचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी चाकणकरांचे काही जुने फोटोही दाखवले होते, ज्यामध्ये त्यांच्या अनामिकेला बँडेज केल्याचे दिसत आहे.
चहुबाजूने करण्यात आले आहेत. खरात प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त कारवाईचे आदेश पोलिसांना दिले. सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांची खरात याच्याबरोबर उठबस असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यात अजित पवार गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या खरात याच्या ट्रस्टवर आहेत. सुषमा अंधारे यांच्यासह रूपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर आरोप केले आहेत. शुक्रवारी रूपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माझा खरात याच्या ट्रस्टबाबत संबंध आहे. मात्र, त्याच्या कारनाम्याबाबत मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी रूपाली चाकणकर यांची बाजू फेटाळून लावली. त्यांना तात्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या, असे स्पष्ट आदेश दिले. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत असून, जे कोणी दोषी असतील त्यांना पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले. त्यामुळे चाकणकर राजीनामा देण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले राजीनामा पत्र चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले.
अशोक खरात प्रकरण हे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे सेक्स स्कँडल आहे. यात महायुती सरकारमधील काही मंत्रीही अडकले असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्या सरकारमधील काही मंत्रीही खरात याच्याशी संबंधित आहेत, ही माहिती मिळाल्यावरही महिलांवरील अत्याचार करणाऱ्याला शिक्षा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढाकार घेतला. एक मंत्री हा खरात याची मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करायचा. तसेच, अनेक नेते आणि मंत्री हे आपले राजकीय भवितव्य जाणण्यासाठी त्याच्याकडे जात होते. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत.