मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी (दि.६ ऑगस्ट) वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. (Source- Devendra Fadnavis | X)
मुंबई

Madhuri Elephant | ‘माधुरी’ हत्तीण सुखरुप नांदणीत परतणार?; 'वनतारा'च्या टीमसोबत CM फडणवीसांची चर्चा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली

दीपक दि. भांदिगरे

Madhuri Elephant Kolhapur

गुजरातमधील 'वनतारा'मध्ये नेण्यात आलेल्या ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत मंगळवारी (दि.५ ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. त्यात माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी, बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत मुंबईत सविस्तर चर्चा केली. ''महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे,'' अशी माहिती स्वतः फडणवीस यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.

या चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

३४ वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात होती. ती पुन्हा मठात परत यावी, ही सर्वांची इच्छा आहे. नांदणी मठाकडून एक याचिका दाखल करावी आणि त्याचवेळी राज्य सरकारही एक याचिका दाखल करेल. दोघांच्या याचिकांमधून सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे मांडणी केली जाईल, असे फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले होते.

माधुरीची हत्तीणीची निगा राखण्यासाठी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे एक विशेष पथक नेमली जाईल. तिचा आहार, आरोग्य आणि देखरेखीची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नांदणीतील मठातून ‘माधुरी हत्तीण’ला २८ जुलै रोजी गुजरातमधील वनतारामध्ये नेण्यात आले. याच दिवशी संतप्त जमावाने आक्रोश केला. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत पोलिसांच्या ७ गाड्यांचे नुकसान झाले. यात १२ पोलीस जखमी झाले. त्यानंतर गावागावातून मूकमोर्चे, ग्रामपंचायतीचे ठराव, गाव बंद, कँडल मार्च काढण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT