मुंबई : मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय आम्हीच घेतला. हे आरक्षण अद्याप न्यायालयात टिकून आहे. आरक्षणासह अन्य हिताचे निर्णयही आम्हीच घेतले. ओबीसी प्रवर्गात आधीच 350 जाती आहेत. आता त्यातून आरक्षण देण्याच्या मागणीचा विचार समाजातील विचारवंतांनी करावा. मराठा समाजाचे हित कशात आहे, याचा अभ्यास करून मागणी केली पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केले. त्याचवेळी लोकशाही मार्गाने होणार्या आंदोलनांना सामोरे जाण्याचा तसेच त्या मागण्या लोकशाही चौकटीत पूर्ण करण्याच्या भूमिकेचाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. तसेच मराठा समाजाचे आंदोलन आम्ही सामाजिक द़ृष्टिकोनातूनच पाहात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेवर तसेच मराठा समाजाच्या विविध बाबींवर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, शासन दोन्ही समाजांच्या हिताचा विचार करेल. कुठल्याही समाजाला दुसर्या समाजाच्या समोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही. त्यामुळे कोणावर अन्याय करून दुसर्याला काही देण्याचा प्रश्न नाही. दोघांचेही प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. त्यामुळे ओबीसी समाजाने त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे लक्षात ठेवावे. मराठा समाजाचेही सर्व प्रश्न आम्हीच सोडवले आहेत, हे ध्यानात घ्यावे. मराठा समाजाचे प्रश्न दुसरे कोणीही सोडविले नाहीत. मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय कोणी सोडविले नाहीत. मी मुख्यमंत्री असताना आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच प्रश्न सुटले आहेत. आताही आम्हीच समाजाचे प्रश्न सोडविणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.