मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली जावी आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई केली जावी, यासाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शलना आता मुंबईतून हद्दपार करण्याच्या विचारात महापालिका आहे. महापालिकेच्यावतीने नियुक्त संस्थांच्या क्लीन अप मार्शल बाबत स्थानिक लोकांच्या तक्रारी वाढत असल्याने तसेच हे लोक पालिका अधिकाऱ्यांच्या नावाखाली खंडणी वसूल करत असल्याचा प्रकार समोर आल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय प्रशासन स्तरावर घेऊन लवकर सर्व संस्थांचे कंत्राट रद्द करणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्यावर्षी ४ एप्रिल २०२४ रोजी पासून मुंबईभर स्वच्छता राखण्यासाठी क्लीन अप मार्शलची प्रत्येक विभागात ३० जणांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, हे क्लीन अप मार्शल खाजगी वेषात फिरून दंड आकारण्याच्या लोकांना लुबाडत असल्याचा प्रकार समोर आला होता. अशा तक्रारी महापालिकेकडे तसेच पोलिसांकडेही नोंदवण्यात आले आहे. मागील २० फेब्रुवारी रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी याबाबतचा आढावा घेतला. यामध्ये प्रत्यक्षात मार्शलची नियुक्ती झाल्यापासून ते १८ फेब्रुवारी २०२५ या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये अस्वच्छतेस कारणीभूत ठरलेल्या १ लाख ४० हजार ५८४ नागरिकांकडून ४ कोटी ५४ लाख ५१ हजार ४१२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली होती.
या बैठकीनंतरही क्लीन अप मार्शलची अरेरावी कमी होत नव्हती. त्यांच्याकडून नागरिकांची लूट सुरूच होती यामुळे प्रशासनाने नेमलेल्या संस्थांच्या क्लीन अप मर्धलाची मोहीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच. या क्लीन अप मार्शलचा कामाचा कालावधी येत्या ४ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
क्लीन-अप मार्शल म्हणजे शहरातील स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणारे अधिकृत कर्मचारी किंवा स्वयंसेवक. हे मार्शल सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या, थुंकणाऱ्या किंवा घाण करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करतात. अनेक महानगरपालिका शहर स्वच्छ ठेवण्यासाठी क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करतात.