Engineering, Pharmacy Admissions |बारावीच्या ५५ : ६० टक्क्यांच्या गुणांचे वेटेज? 
मुंबई

Engineering, Pharmacy Admissions |बारावीच्या ५५ : ६० टक्क्यांच्या गुणांचे वेटेज?

अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेश गुणांचे गणित बदलणार; सीईटीसोबत बारावीच्या गुणांचा गुणवत्ता यादीत विचार

पुढारी वृत्तसेवा

पवन होन्याळकर

मुंबई : अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांना अधिक महत्त्व देण्याच्या हालचाली सुरू आहेत. खुल्या प्रवर्गासाठी ६०, तर राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुणांची किमान अट ठेवण्याच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याचे समजते. त्याचबरोबर बारावीतील गुण आणि एमएचटी-सीईटीतील पर्सेंटाइल यांचा एकत्रित विचार करून गुणवत्ता यादी निश्चित करण्याचे सूत्रही असेल याबाबतही विचार केला जात आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सध्या एमएचटी-सीईटीच्या पर्सेंटाइलला प्रमुख महत्त्व आहे. बारावीतील गुणांची भूमिका प्रामुख्याने प्रवेशासाठीची पात्रता पूर्ण करण्यापुरतीच मर्यादित आहे. या पद्धतीत बदल करून विद्यार्थ्यांची बारावीची टक्केवारी आणि एमएचटी-सीईटीतील गुणांनाही वेटेज दिले जाणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या आयुक्तांनी २ सप्टेंबर रोजी अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी गुणवत्ता निश्चितीची पद्धत बदलण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यानंतर या विषयाचा अभ्यास करून शिफारसी शासनाला करण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीच्या यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत.

बारावीच्या परीक्षेतील गुण आणि एमएचटी-सीईटी पर्सेंटाइल यांना गुणवत्ता यादीत किती प्रमाणात स्थान द्यायचे, पीसीबी आणि पीसीएम या गटातील विषयांना महत्व, दोन्ही परीक्षांच्या निकालांमध्ये समतोल साधता यावा, गुणवत्ता निश्चितीची पद्धत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ राहावी तसेच सर्व उमेदवारांना समान संधी मिळावी अशा विविध मुद्यावर समिती सदस्यांनी चर्चा केली आहे. बारावीचे गुण आणि सीईटीतील पर्सेंटाइल यांचे प्रमाण निश्चित करून गुणवत्ता यादी तयार करण्याची शिफारस झाल्यास त्याची अंमलबजावणी कोणत्या प्रवेश वर्षापासून करता येईल, याबाबतही समिती शिफारस करणार आहे.

याबरोबरच बारावीच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी किमान ६० टक्के आणि राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुणांचा निकष ठेवण्याच्या पर्याय समोर आला आहे. सध्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी पीसीएम गटात सर्वसाधारण प्रवर्गासाठी किमान ४५ टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४० टक्के गुणांची पात्रता आहे. औषधनिर्माणशास्त्रासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५० टक्के, तर राखीव प्रवर्गासाठी ४५ टक्के गुणांची अट आहे. ही पात्रता पूर्ण केल्यानंतर गुणवत्ता निश्चितीत एमएचटी-सीईटी पर्सेंटाइल गुणावर विद्यार्थ्यांला प्रवेश मिळतो.

जेईईच्या माध्यमातून बारावीच्या गुणांची स्वतंत्र पात्रता पूर्ण करावी लागते. खुल्या प्रवर्गासह किमान ७५ टक्के, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ६५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. यानुसार आता एमएचटी सीईटीसाठीही पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. शिफारशींना अंतिम रूप देण्यासाठी बैठक होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT