Cipla Company DRI Raid pudhari photo
मुंबई

Cipla Company DRI Raid : ‘सिप्ला’च्या विक्रोळी कार्यालयासह भिवंडीतील गोदामाची झाडाझडती

डीआरआयची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : औषधनिर्मिती क्षेत्रातील नामांकित सिप्ला कंपनीच्या कार्यालयासह भिवंडी येथील गोदामावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाने झाडाझडती घेतली. आयात केलेल्या औषधाचे वर्गीकरण आणि त्यावर मिळालेल्या सीमाशुल्क सवलतीबाबत ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विक्रोळी येथील सिप्लाच्या कार्यालयात तसेच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कंपनीच्या गोदामात तपासणी केली. सीमाशुल्क कायदा १९६२ मधील कलम १०५ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. आयात केलेल्या औषधाच्या वर्गीकरणाबरोबरच त्याला सीमाशुल्कातून सवलत मिळण्यासंबंधीचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले आहेत का, याची पडताळणी या तपासातून केली जात असल्याचे समजते.

दरम्यान, या कारवाईबाबत सिप्ला कंपनीने शेअर बाजाराला अधिकृत माहिती दिली आहे. डीआरआयच्या मुंबई विभागाने केलेल्या तपासणीदरम्यान कंपनीने अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केले. या कारवाईमुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर, दैनंदिन कामकाजावर किंवा अन्य व्यवहारांवर कोणताही मोठा परिणाम झालेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

  • परदेशातून औषध आयात करताना त्याचे स्वरूप, प्रकार आणि वापर यानुसार वर्गीकरण करावे लागते. या वर्गीकरणावर त्या औषधाला किती आयात शुल्क भरावे लागेल किंवा कोणती सवलत मिळू शकेल, हे ठरते. त्यामुळे आयात केलेल्या औषधाचे वर्गीकरण योग्य पद्धतीने झाले होते का आणि सीमाशुल्क सवलतीचा लाभ नियमानुसार घेतला होता का, याची माहिती डीआरआयकडून तपासली जात आहे. मात्र, संबंधित औषधाचे नाव, त्यावरील शुल्काचा तपशील किंवा नेमकी कोणती अनियमितता तपासली जात आहे, याबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT