नवी मुंबई: राजेंद्र पाटील
सिडकोने अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमतीचे पुनरावलोकन करून तसा अहवाल राज्य सरकारला सादर करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यासोबतच इतर विषयांवर नागपूर येथे झालेल्या या बैठकीत केली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सह- व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता, आमदार शशिकांत शिंदे, विक्रांत पाटील तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सिडकोची अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किंमती जास्त असल्याने त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, तसेच काही ठिकाणी खाजगी विकासकांच्या घरांच्या किंमती सिडको प्राधिकरणाच्या घरापेक्षा स्वस्त असल्याची परिस्थिती आहे. या वाढीव किंमती कमी करून घर खरेदी करणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यासोबतच करांचा बोजा, दंडाची रक्कम यामुळे नागरिकांना विनाकारण भुर्दंड सोसावा लागत असल्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. या किंमती निश्चित करण्यामागे नक्की काय कारणे आहेत ते जाणून घेऊन अल्प आणि मध्यम गटातील घरांच्या किमतीचे पुनर्वलोकन करून त्यानंतरच याबाबत सर्वंकष निर्णय घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.
वाशी ट्रक टर्मिनल येथील सिडको घरांबाबत माथाडी बांधवांना विशेष कोटा वाढवून मिळावा अशी मागणी बैठकीत माथाडी नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी यावेळी केली. ही घरे गरिबांसाठी असल्याने त्याचा विचार ठेवून अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी केली.