नवी मुंबई : सिडकोमार्फत ‘माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ऑक्टोबर 2024’ या योजनेत नवी मुंबईतील उलवे, बामणडोंगरी, खारघर, कामोठे, खांदेश्वर, तळोजा येथेे काढलेल्या लॉटरीत अनेकांना घरे लागली. मात्र या घरांच्या किमती अधिक असल्याने लॉटरी धारकांमध्ये नाराजी पसरली आणि या किमती कमी करण्यासाठी जनआंदोलन उभे राहिले. मोर्चे निघाले, मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. पण किमती कमी झाल्या नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यात आले. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत घरांच्या किमती कमी करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता आहे.
घरांच्या किमतीबाबत 10 जुलैला विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, आमदार विक्रांत पाटील यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले होते.त्यांनी सिडकोच्या गृहधोरणाबाबत तसेच वाढीव किमतींवर शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. आरटीआयमधून समोर आलेल्या माहितीनुसार सिडकोच्या अंतर्गत सर्वेक्षणात घरांच्या मूळ किमती सध्याच्या घोषित दरांपेक्षा 30 ते 50 टक्क्यांनी कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सिडको सोडतधारकांमध्ये घरांच्या किमतीबद्दल आशा निर्माण झाली.
सिडकोच्या घरांच्या वाढीव किमतीबाबत सिडकोने हा निर्णय राज्य सरकारकडे म्हणजे नगरविकास विभागाकडे सोपवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे निवेदने दिली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह व्यवस्थापकीय संचालक यांना विचारणाही झाली. मात्र त्यानंतर काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. उलट सिडकोकडून घरांच्या किमती कमी होणार नाहीत, घरांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे, अशी उत्तरे सिडकोने दिली.
प्रत्यक्षात मात्र स्थिती उलट आहे. विक्री झालेली घरे, आलेले अर्ज, लॉटरी लागलेले सोडतधारक, पैसे भरलेले सोडतधारक आणि थेट सिडकोला लॉटरी लागलेल्या सोडतधारकांनी घर नको असल्याचे कळवले. सोडतधारक यांची संख्या पाहता सिडकोची घरे महाग असल्याने नाकारण्यात आल्याचे चित्र खुद्द मनसेने केलेल्या आंदोलनात समोर मांडले होते.
घरांच्या किमतीबाबत सकारात्मक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडींचे आराध्य दैवत स्व. आण्णासाहेब पाटील यांच्या जयंती कार्यक्रमात घरांच्या दरांबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल,असे स्पष्ट केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सिडको घरांच्या किमतीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे स्पष्ट केले होते. यावेळी त्यांनी पोलीस गृहनिर्माण योजनेतील घरांची किंमत 50 लाखांवरून 15 लाखांपर्यंत कमी केल्याचा दाखलाही दिला होता.
मंत्रालयात चार बैठका झाल्या; अद्याप निर्णय नाही
सिडकोच्या घरांच्या किमती आणि बिल्डरच्या घरांच्या किमतीचा आणि क्षेत्रफळाचा लेखाजोखा दै. पुढारीने 9 जानेवारी रोजी मांडला होता. याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर मंत्रालयात चार बैठका झाल्या होत्या. मात्र निर्णय अद्याप झाला नव्हता. यामुळे आता महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकार सिडकोच्या घरांच्या किमती कमी करू शकतो. सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, आमदार विक्रांत पाटील, नगरविकास खात्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सिडकोच्या सूत्रांनी दिली.