मुंबई; वृत्तसंस्था : फर्निचर वगळता तीन चौरस मीटरची वैयक्तिक जागा, सहा डॉक्टर आणि नर्सेससह 24 तास वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय अधिकार्यांच्या सूचनेनुसार आवश्यक उपकरणे पुरवणार, बरॅकच्या जाळीच्या खिडक्या आणि पंखा, अशा सुविधा पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला देण्याची हमी देणारे पत्र केंद्रीय गृह मंत्रालयाने बेल्जियमच्या न्याय मंत्रालयाला दिले. प्रत्यार्पित केल्यानंतर त्याला मुंबईत ठेवले जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
हे पत्र महाराष्ट्र सरकार आणि कारागृह प्रशासनाच्या सल्ल्याने तयार केले आहे. यामध्ये चोक्सीच्या मानवाधिकार चिंतेचे निवारण करण्यासाठी काही विशेष तरतुदी केल्या आहेत. या पत्रात म्हटले आहे की, भारतात चोक्सीला ठेवण्याच्या अटी आंतरराष्ट्रीय मानकांपेक्षा कमी नसतील. चोक्सीच्या आरोग्याशी संबंधित पूर्वीचे वैद्यकीय अहवाल विचारात घेतले जातील आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत उपचार व उपकरणे दिली जातील.