वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वर्सोवा ते वसई फाटा दरम्यान सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता जीवघेणी ठरू लागली आहे. गुरुवारी रात्री मुंबई महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावरील ससूनवघर गावाजवळ ही घटना घडली आहे. रियान शेख असे दीड वर्षीय मुलाचे नाव आहे. पाच तास ही रुग्णवाहिका ट्रॅफिक जॅममध्ये अडकली होती.
रियान हा आपल्या नातेवाईकांकडे आला होता. गुरुवारी दुपारी खेळता खेळता रियान चौथ्या मजल्यावरून पडला होता. त्यानंतर त्याला तातडीने पेल्हार येथील एका रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होती. मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून मुंबई येथे उपचारासाठी नेत होते. मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासूनच वर्सोवा पूल ते नायगाव फाटा या दरम्यान मुंबई वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली होती. रुग्णवाहिका बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने ससूनवघर गावाजवळील परिसरात पोहचताच रियान याचा मृत्यू झाला. या घडलेल्या घटनेमुळे महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ठाणे तसेच घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहाटे 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ठाणे तसेच घोडबंदर भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. असे जरी असले तरी या अवजड वाहन बंदीचा परिणाम हा वसई विरार भागातील महामार्गावर होऊ लागला आहे.