मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाणदिनी बुधवारी दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळलेला होता. पहाटेपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आलेल्या आंबेडकरी अनुयायींची गर्दी झाली होती. दादर रेल्वेस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईसह राज्यभरातील भीमसैनिकांची पावले दादरच्या चैत्यभूमीकडे जात होती. लोकल, एक्स्प्रेस गाड्यांतून भरगच्च भरून महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी आनुयायी मुंबईत दाखल झाले होते.
सकाळी 8 च्या दरम्यान राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार अनिल परब, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, खासदार यांनी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.
चैत्यभूमीवर आलेल्या आंबेडकरी अनुयायींनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून शिवाजी पार्कवरील पुस्तके आणि ग्रंथ विक्री स्टॉलवर गर्दी केल्याचे चित्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांच्या भाषणांचे खंड, शुद्र पूर्वी कोण होते? यासह पुरोगामी साहित्य, पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे मूर्ती आणि ग्रंथ विक्रेते किरण दाभाडे यांनी सांगितले.