पुढारी ऑनलाईन डेस्क : मी जे करतो, ते उघडपणे करतो, विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. एनडीआरएफच्या निकषांपुढे जाऊन आम्ही शेतकऱ्यांना मदत दिली आहे. सर्वाधिक निधी शेतकऱ्यांना दिला आहे. आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या पंपाचंही बील माफ केले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. २९) सांगितले.
आमदार प्रतापराव सरनाईक यांनी राज्यात तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी केली. यावरील विधानसभेतील लक्षवेधीवर मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. बेरोजगार भावाला १० हजार रूपये देणार आहोत. शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत आम्ही केली आहे. सर्वसामान्यांना ३ सिलिंडर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधक जंग जंग पछाडले, तरीही पंतप्रधान मोदी यांना ते हटवू शकले नाहीत. मोदी तिसऱ्यांदा पीएम झाले आणि विरोधकांनी हारल्याचे पेढे वाटले, असा टोला त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला लगावला. दरम्यान, सभागृहात विरोधकांनी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला. यावर विरोधकांनी खरे ऐकण्याची सवय लावून घ्यावी, असा टोला शिंदे यांनी लगावला.