मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
मुंबई

महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक येणार ः फडणवीस

दावोस जागतिक आर्थिक परिषदेसाठी मुख्यमंत्री झुरिचमध्ये दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबाबत विविध जागतिक कंपन्यांसोबत चर्चा सुरू आहे. या चर्चा सकारात्मक असून यातून महाराष्ट्रात उद्योग उभारणी आणि गुंतवणुकीचे सामंजस्य करार होतील. राज्यात मोठी परकीय गंतवणूक येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस हे रविवारी झुरिच येथे दाखल झाले.

दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 20 ते 24 जानेवारी या कालावधीत गुंतवणूक परिषद आयोजित केली आहे. रविवारी झुरिच येथे हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेने पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत त्यांचे स्वागत केले. या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. सकाळी 6 वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागांतून मराठी बांधव आवर्जून उपस्थित राहिले. या स्वागताने मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना येथे अनुभवल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी या स्वागतानंतर बोलून दाखविली.

महाराष्ट्र म्हणजे भारताचे पॉवर हाऊस

या दौर्‍याच्या निमित्ताने फडणवीस यांनी वैश्विक मराठी परिवारातील मराठी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले, आपला महाराष्ट्र म्हणजे भारताचे पॉवर हाऊस असून, देश 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था झाल्यानंतर एक ते दोन वर्षांतच महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होईल. एआय तंत्रज्ञानात आघाडी घेतलेला महाराष्ट्र हा भारताचे डेटा सेंटर कॅपिटल बनला आहे. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटी तयार करणार आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून मराठीला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी स्वित्झर्लंडसह वैश्विक मराठी परिवारातील मराठी बंधू-भगिनी आमचे राजदूत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी बृहन महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंडचे अध्यक्ष अमोल सावरकर, सेक्रेटरी कीर्ती गद्रे, महेश बिरादार आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रात गुंतवणूक अपेक्षित

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमी कंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न याद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न होईल. प्रामुख्याने रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

गेल्या दोन वर्षांत विक्रमी करार ः सामंत

मागील दोन वर्षांत दावोस परिषदेत विक्रमी सामंजस्य करार झाले असून, त्यातील 83 टक्के करार प्रत्यक्षात आल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले. मागील दोन वर्षांत केलेले विक्रमी सामंजस्य करार याच प्रथेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे सुरू राहतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादाने दावोसहून विक्रमी गुंतवणूक राज्यात आणून लाखो तरुणांसाठी रोजगार निर्मिती केली जाईल, याची खात्री देतो, असे त्यांनी सांगितले. मंत्री सामंतही दावोस परिषदेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT