भिवंडी : तब्बल चार एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारत असून, या मंदिराचा लोकार्पण सोहळा 17 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी दिली. मंदिरात येणार्या शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास कळावा यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये भाषांमध्ये देखाव्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे.
अखंड काळ्या पाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांची सहा फूट उंचीची सिंहासनारूढ मूर्ती या मंदिरात साकारण्यात आली आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाची मूर्ती घडविलेले म्हैसूर येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मूर्तिकार अरुणयोगी राज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारली आहे.
चार एकर परिसरातील एक एकर क्षेत्रावर 56 फूट उंचीचे हे मंदिर गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले असून पुढील 400 वर्षे टिकेल अशा पद्धतीने त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मंदिराचा सभामंडप परिसर 2500 चौरस फूट क्षेत्राचा आहे. मंदिराभोवती, तटबंदीसह, चारही कोपर्यांवर गोलाकार बुरूज, टेहळणी मार्ग, आणि महाद्वाराची रचना करण्यात आली आहे.