मुंबई : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण, अर्थातच ईडीपासून सुटका झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्मच होता, असा दावा छगन भुजबळ यांनी आपल्याला एका मुलाखतीत केल्याचे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटले गेले आहे.
भुजबळांच्या या वक्तव्याने भाजप आणि महायुतीची कोंडी होणार असून, विरोधी महाविकास आघाडीच्या हाती आयते कोलित या वक्तव्याने दिले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘2024 : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात छगन भुजबळ यांच्याशी संबंधित अनेक दावे करण्यात आले आहेत.
या पुस्तकातील काही उतारे माध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण असे काही बोललोच नसल्याचे सांगितले आहे. तसेच, निवडणूक झाल्यानंतर यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी 100 कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. भाजपमध्ये सहभागी व्हा, तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना तुरुंगात असताना देण्यात आला होता, असा आरोप खुद्द देशमुख यांनी केला होता. त्याचा दाखलाही भुजबळ यांनी दिला. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते, असे भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दिलेली माहिती शंभर टक्के खरी आहे. मंत्री भुजबळ हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीची नोटीस आली होती. नव्याने कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची त्यांची मानसिकता नव्हती. त्यामुळे भुजबळ यांनी महायुतीच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केला. हिंगणघाट येथील प्रचारसभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.