Chhagan Bhujbal  Pudhari
मुंबई

Chhagan Bhujbal: अखेर भुजबळांना मंत्रिपद? आज शपथविधी सोहळा

Maharashtra Cabinet Expansion 2025: धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी वर्णी लागण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Chhagan Bhujbal Maharashtra Cabinet Expansion 2025

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवारी, 20 मे) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्याने हे खाते रिक्त होते. या खात्यावर छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून सकाळी 10 वाजता राजभवन येथे शपथविधी सोहळा पार पडणार आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले खाते भुजबळांना दिले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी भूजबळांव्यतिरिक्त आणखी कोणाला संधी मिळणार का याकडेही अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. देशमुख यांच्या हत्येचे फोटो व व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाले. त्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. मुंडेच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल आणि त्यांना धनंजय मुंडेंची खाती मिळणार अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झाले असून मंगळवारच्या शपथविधी सोहळ्याबाबतचे पत्रक माध्यमांना पाठवण्यात आले आहे. नेमकं कोण शपथ घेणार याचा उल्लेख पत्रकात नसला तरी भुजबळांना मंत्रिपद मिळणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

छगन भुजबळ यांची राजकीय कारकिर्द

भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी नाशिक येथे झाला. मुंबईतील व्ही.जे.टी. आयमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली असून येवला – लासलगाव मतदारसंघातून निवडून आले आहे. 1973 मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडून आले. 1973 ते 84 या कालावधीत ते मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेता होते. 1985 मध्ये ते मुंबईचे महापौर झाले. 1985 आणि 90 मध्ये ते मुंबईतील माझगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महसूल, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम अशा विविध मंत्रालयाचे मंत्रिपद सांभाळले आहे. राष्ट्रीय स्तरावर ओबीसी समाजाचे नेते अशी त्यांची ओळख आहे.

मंत्रिमंडळ विस्तार

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 288 पैकी 230 जागांवर विजय मिळाला होता. यात भाजपने 132 जागा जिंकून मुख्यमंत्रिपदावर दावा केला. तर शिवसेनेने (एकनाथ शिंदे) 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागांवर विजय मिळवला.

निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. तर 15 डिसेंबर रोजी झालेल्या शपथविधी सोहळ्यात 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ गेतली. यात भाजपच्या 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 11 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 9 जणांनी शपथ घेतली होती. आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांची वर्णी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT