पुढारी न्यूज महासमिटमध्ये बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ. pudhari photo
मुंबई

Maha Summit 2025 : मराठा समाजाला सरकारकडून जास्त फायदे!

मंत्री छगन भुजबळ यांचा दावा ः मुंबईत जगभरातून लोक येतात, जरांगे आले तर बिघडले कुठे?

पुढारी वृत्तसेवा

मुंबईः मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिले आहे. तसेच महाज्योतीपेक्षा ‘सारथी’च्या माध्यमातून सरकारकडून मराठा समाजाला जास्त फायदे मिळत आहेत, असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चळवळीचे अध्वर्यू छगन भुजबळ यांनी पुढारी न्यूज महासमिटमध्ये केला.

पुढारी न्यूजच्या अँकर नम्रता वागळे यांनी साधलेल्या संवादात मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचाही विषय निघाला. ऐन गणपतीत जरांगे मोर्चा घेऊन मुंबईत धडकत आहेत. त्याबद्दल छेडले असता भुजबळ आपल्या खास शैलीत म्हणाले, मनोज जरांगे हे मुंबईत मोर्चा आणण्यावर ठाम आहेत? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, मुंबईत जगभरातले लोक येतात. त्यामुळे जरांगे मुंबईत आल्याने बिघडले कुठे?

मराठा समाजाला ओबीसींपेक्षा भरभरून दिले आहे. मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, तरीही मनोज जरांगे यांच्या काही मागण्या असतील, तर त्यांनी मराठा समाजासाठीच्या मंत्र्यांच्या समितीकडे कराव्यात; पण जरांगे यांना ओबीसीतून आरक्षण हवे आहे. मी ओबीसींसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंगावर घेतले होते. त्यामुळे ओबीसींसाठी कोणताही संघर्ष करायला तयार आहे. ओबीसींना मिळालेले आरक्षण आम्हाला सांभाळायचे आहे. त्यामुळे जरांगे यांनी कितीही हट्ट धरला, तरी तो पूर्ण होणार नाही. ओबीसी महाराष्ट्रात 54 टक्के असून त्यांचे आरक्षण काढून त्यांना रस्त्यावर टाकणार आहात का, असा सवाल भुजबळ यांनी केला.

मुुंबई राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चळवळीचे अध्वर्यू छगन भुजबळ यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करताना ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन एमिरेटस् आणि मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव, पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी.

नाशिक कुंभमेळ्यावरून मंत्र्यांमध्ये वाद सुरू आहेत. त्याकडे लक्ष वेधले असता भुजबळ म्हणाले, माझा कोणत्याही कंत्राटात रस नाही. कुंभमेळ्याच्या निमित्ताने निधी मोठ्या प्रमाणावर येणार आहे. तो नाशिकसाठी योग्य पद्धतीने खर्च व्हावा, ही माझी इच्छा आहे. मी पालकमंत्री असताना मुंबई-नाशिक रस्त्यासह अनेक कामे केली. मी नाशिकचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे मला माहिती घेण्याचा अधिकार आहे. मी सूचना करण्यासाठी बैठक घेतली. पालकमंत्री कोणाला करायचे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. प्रत्येक पक्षाला पालकमंत्रिपद हवे असते. रायगडला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एक आमदार आहेत, तरी पालकमंत्रिपद हवे अशी मागणी आहे. नाशिकला 7 आमदार आहेत; पण यावर वाद नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

आनंदाचा शिधा योजना बंद करावी लागतेय का, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, शेवटी निधीसाठी वित्त विभागाकडे जावे लागते. एखादी मोठी योजना आली, तर इतर योजनांच्या निधीला कात्री लावली जाते. घर चालविताना पगाराच्या पैशाची मांडणी करावी लागते. तसेच सरकार वागत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी काही सोसावे लागेल. लवकर आर्थिक स्थिती पूर्वपदावर येईल.

पंतप्रधान मोदींचे आभार

समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस देशभर साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, याबद्दल भुजबळ यांनी मोदी यांचे आभार मानले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्रांती केली. फुले यांच्यासारखी काही रत्ने ही मुद्दाम झाकली गेली; पण आता त्यांना न्याय मिळत आहे, हे महत्त्वाचे आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT