मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्ता प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीवर आधारित ही कारवाई पुन्हा सुरू होणार असून, विशेष न्यायालयाने बेहिशेबी आणि बेनामी मालमत्ता प्रकरणाची चौकशी पुन्हा चालू करण्याचे आदेश दिले आहेत. दमानिया यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे.
दमानिया यांनी 2016 मध्ये आयकर विभागाकडे भुजबळ व कुटुंबीयांच्या बेनामी मालमत्तांबाबत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात आयकर विभागाने भुजबळ कुटुंबावर बेनामी व्यवहार कायद्यांतर्गत आरोप ठेवून त्यांच्या 300 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या होत्या. मात्र, भुजबळ यांना सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मात्र, पुनर्विचार याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाचा आदेश रद्द झाल्याने ही चौकशी नव्याने सुरू होणार आहे.