मुंबई : चेंबूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला घातला असून रात्रीच्या वेळेला नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे चेंबूर परिसरात विशेष रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका आशा मराठे यांनी एम पश्चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
चेंबूर परिसरात रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे. जागोजागी 10 ते 15 कुत्र्यांचे कळप रस्त्यावरून जाणार्या नागरिकांवर हल्ले करत आहेत. सुभाषनगर, सेंट अँथोनी रोड, डायमंड गार्डन, एन. जी. आचार्य मार्ग, पोस्टल कॉलनी, सिद्धार्थ कॉलनी, आतुर पार्क, शिवपुरी कॉलनी, सांडूवाडी, कुर्ला सिग्नल, सिद्धार्थ कॉलनी सर्व्हिस रोड यांसह विविध भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. कुर्ला सिग्नल सिद्धार्थ कॉलनी सर्व्हिस रोडवरील मकवाना सोसायटीमधून घरकाम करून निर्मला कांबळे या घरी जात असताना त्यांच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करत त्यांच्या पायाचे लचके तोडले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती माजी नगरसेविका आशा मराठे यांनी दिली.
एकीकडे शासनाच्या कायदेशीर बंधनामुळे व ‘पेटा’सारख्या प्राणिमित्र संघटनेच्या आग्रहामुळे भटक्या कुत्र्यांवर कारवाई होत नाही, तर दुसरीकडे निर्बिजीकरणाचे प्रमाण देखील कमी झाले आहे. त्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली असून त्यांचे नागरिकांवर हल्लेदेखील वाढले आहेत. काही नागरिक रेबीजची लसही घेत नाहीत. निदान पालिकेने रेबीज लसीकरणाची विशेष मोहीम राबवावी अशी मागणी अशा मराठे यांनी एम पश्चिम विभागाकडे केली आहे.