चेंबूरमध्ये चक्क 22 पार्किंग चोरीला  pudhari photo
मुंबई

Mumbai theft case : चेंबूरमध्ये चक्क 22 पार्किंग चोरीला

पार्किंग शोधून देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर, प्रकरण कोर्टात जाणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ‌‘जाऊ तेथे खाऊ‌’ या मराठी चित्रपटातील विहीर चोरी प्रकरणाची आठवण करून देणारी घटना चेंबूरमधून समोर आली आहे. एका एसआरए इमारतीतील 22 पार्किंग चोरीला गेल्याची तक्रार 2024 मध्ये चुनाभट्टी पोलिसांत दिली आहे. मात्र 650 दिवस उलटूनही या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतलेली नाही. त्यामुळे तक्रारदार ॲड. प्रशांत साने यांनी शुक्रवारी महाराष्ट्रदिनी या पार्किंगची जागा शोधून देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.

या संदर्भात साने यांच्याशी संपर्क साधला असता पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याने न्यायालयात दाद मागणार असल्याचे दैनिक ‌‘पुढारी‌’शी बोलताना सांगितले. सहा वर्षांपूर्वी चेंबूरमधील लालडोंगर येथील वैभव सहकारी गृहनिर्माण संस्था या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये विकासक व्हायटल डेव्हलपर्स व त्याचा भागीदार राजयोग एन्टरप्रायझेस यांनी ओडीना ही इमारत उभारली.

या इमारतीमध्ये एकूण 102 पार्किंग मंजूर असल्याचे स्वारस्यपत्रात आहे. यात 19 कार पार्किंग या पाहुण्यांसाठी व 3 कार पार्किंग हे व्यावसायिक म्हणून आणि 5 पार्किंग एसआरएसाठी होत्या. असे असताना विकासकाने 113 पार्किंगची 8 ते 10 लाखांत विक्री करत घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुळात पार्किंग विकण्याचा वा वाटप करण्याचा अधिकार विकासकाला नसताना त्याने या सर्व पार्किंग विकल्या आहेत. तसेच मंजूर आराखड्यामधील पाहुण्यांच्या 19 पार्किंग आणि 3 कमर्शियल अशा 22 पार्किंग देखील विकासकाने विक्री करत यातून दोन कोटींची कमाई केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या 22 पार्किंग चोरीला गेल्याची तक्रार साने यांनी 9 ऑगस्ट 2024 मध्ये (हस्तपोच व इमेलद्वारे) चुनाभट्टी पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत साने यांचा जबाबही पोलिसांनी घेतला आहे. याला 650 दिवस झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. यामुळे शुक्रवारी महाराष्ट्रदिनी तक्रारदार साने यांनी या 22 पार्किंगची जागा शोधून देणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

जाऊ तेथे खाऊ या मराठी चित्रपटात विहीर चोरी गेल्याची तक्रार देण्यासाठी मकरंद अनासपुरे यांना जे भोगावे लागले याचाच अनुभव मला येत असल्याचे साने यांनी सांगितले. मात्र “मी गप्प बसणार नाही. हे प्रकरण न्यायालयात घेऊन जाईन व या पार्किंगचा शोध घेईन” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टोलवाटोलवीत गेले 650 दिवस

या प्रकरणी पोलिसांत तक्रार आल्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून सदर तक्रारीनुसार आपल्या स्तरावर योग्य ती पाहणी करून त्याविरोधात गुन्हा दाखल करणेकामी पोलीस ठाण्यात हजर रहावे असे कळवले होते. एसआरएने स्वतः चौकशी, पाहणी वा कारवाई न करता संबंधित बांधकाम व्यावसायिकालाच पत्र पाठवून योग्य ती उपाययोजना करून आपला खुलासा सादर करावा,असे कळवले आहे. अशाच प्रकार टोलवाटोलवीत 650 दिवस उलटून गेले तरी ठोस कार्यवाही झाली नसल्याचे तक्रारदार साने यांचे म्हणणे आहे.

माझी केस अनोखी असून सबळ पुरावे आहेत. सोसायटी सदस्यांनीही पहिल्याच सर्वसाधारण सभेत पार्किंग विकत घेतल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. विधानसभेतही आमदार सुनील प्रभू यांनी हा विषय उपस्थित केला होता. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे न्यायालयात दाद मागितली जाईल.
ॲड. प्रशांत साने, तक्रारदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT