Chembur slum landslide risk during monsoon Pudhari
मुंबई

Chembur landslide Prone Area: दीड हजार रहिवाशांचे छत मृत्यूच्या छायेत, दरडींच्या भीतीने ‘ते’ काढतात रात्र जागून

Chembur Landslide Risk: चेंबूरच्या वाशीनाका, भारतनगर टेकडीवरील वास्तव्य जीवघेणे

पुढारी वृत्तसेवा

Chembur landslide danger slum area

मुंबई : प्रसाद जाधव

चेंबूरच्या वाशीनाका, भारतनगर येथील टेकडीसह उतारावर राहणार्‍या दीड हजार रहिवाशांचे छत मृत्यूच्या छायेत आहे. पावसाळ्यात दरड कधी जीव घेईल या भीतीमुळे ते रात्री शांत झोपतही नाहीत. पालिका प्रशासन मात्र धोकादायक झोपड्या म्हणून नोटीस बजावून निश्चिंत राहते.

वाशीनाका भारतनगरमधील बंजारा तांडा, भीम टेकडी, साई टेकडी, गणेश टेकडी, हशू अडवाणी नगर, विष्णूनगर, रायगड चाळ, मास्तर चाळ आणि सह्याद्रीनगरच्या डोंगर उतारावर शेकडो झोपड्या आहेत. टेकडीच्या टोकाशी व उतारावर असलेल्या झोपड्यांमधील कुटुंबे मृत्यूच्या छायेत आहेत. थोडा जरी आवाज आला तरी अख्खं कुटुंब झोपडी सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी धावते. 18 जुलै 2021 ची ती काळरात्र अजूनही येथील लोकांना आठवली की अंगावर शहारे येतात. मुसळधार पावसात दरड कोसळून 19 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर आजही पावसाळ्यात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडतच आहेत.

मागील वर्षी 8 जुलैला मुसळधार पावसामुळे भारतनगरच्या डोंगराळ भागात तीन घरांचे पोटमाळे कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या ठिकाणी राहणारी कुटुंबे हातावर पोट भरणारी असून श्रमिक आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे, अशी मागणी सातत्याने शासन दरबारी होत आहे. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वच स्तरांतून त्यांना केवळ आश्वासनापलीकडे काहीच मिळत नाही. जगण्यासाठी निदान एक तरी सुरक्षित छप्पर द्यावे म्हणून अनेक विनवण्या या श्रमिकांच्या वाट्याला आल्या आहेत.

18 जुलै 2021 मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर अनेकांचे व्हिडीओकॉन व एसजी केमिकलमधील एमएमआरडीएच्या वसाहतीमध्ये पुनर्वसन केले होते. मात्र त्यातील एकालाही अद्याप कोणतीही शासकीय कागदपत्रे न दिल्याने त्या ठिकाणी राहणार्‍या रहिवाशांच्या वास्तव्याचा पुरावा अधांतरी सापडला आहे. ज्या ठिकाणी झोपड्या होत्या, त्या ठिकाणी काहीही राहिले नाही, तर जिथे पुनर्वसन केले त्याठिकाणचे वास्तव्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे शासकीय योजना मिळत नाहीत.

या ठिकाणी आम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहात आहोत. माचिसची पेटी आणायची म्हटली तरी डोंगर उतरून आणि पुन्हा चढून यावे लागते. आमचे हातावर पोट आहे. आमच्या समस्यांचे निवारण करून कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, असे येथील रहिवासी गणेश मोहिते, आणि परशुराम कुळ्ये यांनी सांगितले.

तीन वर्षांतील दुर्घटना

  • 18 जुलै 2021: दरड कोसळून 19 जणांचा बळी गेला.

  • 19 जून 2022: भीम टेकडी येथे भली मोठी दरड कोसळून 2 जण जखमी झाले.

  • जून 2023 : रायगड चाळीतील गुप्ता कुटुंबीयांच्या घरावर दरड कोसळून मोठे नुकसान झाले.

  • 8 जुलै 2024 : मुसळधार पावसाने 3 घरांचे पोटमाळे कोसळले.

विष्णूनगरमध्ये ज्या ठिकाणी व्हिडीओकॉन अतिथी म्हणून प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारती आहेत, त्या इमारतीमध्ये कोणीही प्रकल्पग्रस्त राहायला जात नाही. अनेक इमारतींची अवस्था दयनीय आहे. काही माफियांनी घुसखोरी करून खोल्या भाड्याने दिल्या आहेत.
नरेश खंडागळे, वॉर्ड अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
टेकडीवर धोकादायक स्थितीत राहात असलेल्या झोपडीधारकांसाठी शासनाने अजून धोरण निश्चित केले नाही. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे. त्याचप्रमाणे पुन्हा टेकडीवर झोपड्या उभ्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
निधी प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT