Chembur Water Shortage Pudhari
मुंबई

Chembur Water Shortage: चेंबूरच्या काळारोड भागात महिनाभरापासून पाणीबाणी; टँकरने पाणीपुरवठा

पाण्यासाठी रात्र-रात्र काढावी लागते जागून

पुढारी वृत्तसेवा

कुर्ला: चारशे घरांची लोकवस्ती असलेल्या चेंबूरच्या काळारोड परिसरात गेल्या महिनाभरापासून पाण्याची मोठी किल्लत आहे. येथील नळांना पाणीच येत नसल्याने नागरिकांना रात्र-रात्र जागून पाणी भरावे लागत आहे. त्यातच महापालिकाही या प्रश्नाकडे कानाडोळा करत असल्याने नागरीकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसराला लागून हा काळारोड परिसर असून येथील भीमवाडी रहिवासी संघ या भागातील नागरीकांना ही समस्या भेडसावत आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात रस्त्यांची कामे सुरू होती.

या कामासाठी या परिसरात मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. तेव्हापासून काळारोड परिसरातील नळांचे पाणी गायब झाल्याची माहिती नागरीकांनी दिली. पूर्वी वेळेवर व पुरेसा पाणीपुरवठा या परिसरात होत होता. मात्र महिनाभरापासून पाणीच मिळत नसल्याने रहिवाशांना पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गेल्या महिनाभरापासून नागरिकांना इतर परिसरात जाऊन पाणी भरावे लागत आहे. मात्र इतर परिसरातही रात्री पाणी येत असल्याने पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत असल्याची माहिती नागरीकांनी दिली.

याबाबत महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर अनेकदा याठिकाणी येऊन पाहणी करण्यात आली. मात्र अद्याप तरी पाणी न येण्याचे कारण महापालिका अधिकाऱ्यांना मिळालेले नाही. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेकडून याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

मात्र हे पाणी पुरतच नसल्याने पाण्यासाठी परिसरात नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ येथील पाणीप्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT