मुंबई : कोण नामदेव ढसाळ, असा उर्मट सवाल करणार्या सेन्सॉर बोर्डाला जन आंदोलनाच्या रेट्यामुळे अखेर नमते घ्यावे लागले. त्यामुळे ‘चल हल्ला बोल’ सिनेमाला नामदेव ढसाळ यांच्या कवितेसह प्रमाणपत्र दिले आहे. लोकांचा सिनेमा चळवळीच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी ‘चल हल्ला बोल’चे निर्माता, दिग्दर्शक महेश बनसोडे, लोकांचा सिनेमा चळवळीचे संजय शिंदे आणि सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचे रवी भिलाणे उपस्थित होते. ‘चल हल्ला बोल’ सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारल्यानंतर मोठा वाद उफाळून आला होता. बहुजनांची अभिव्यक्ती आणि संविधानिक अधिकार डावलणार्या सेन्सॉर बोर्ड विरोधात दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता महेश बनसोडे, लोकांचे दोस्त रवी भिलाणे, संजय शिंदे, ज्योती बडेकर, बाळासाहेब उमप, अभिनेत्री प्रतिभा शर्मा, कॉ. सुबोध मोरे, कष्टकरी शेतकर्यांचे नेते विठ्ठल लाड, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, पँथर सुमेध जाधव, डॉ. स्वप्निल ढसाळ, डॉ. संगीता ढसाळ, मयूर शिर्के, संतोष अभंगे, फिरोज मुल्ला, राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सेन्सॉर बोर्डविरोधी आंदोलन उभे राहिले.
विधानसभेत हा विषय गाजला. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा, बामसेफ अशा विविध पक्ष आणि जन संघटनांनी सेन्सॉर बोर्डविरोधात तीव्र भूमिका घेतल्या. मुंबई मराठी पत्रकार संघाचे संदीप चव्हाण,दिवाकर शेजवळ आदी ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांचे पत्रकार सहकारी तसेच शोध पत्रकार निरंजन टकले आदींनी सक्रिय पाठिंबा दिला. पुनरावलोकन कमिटीचे प्रमुख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक टी. एस नागा भरण्णा, सेन्सॉर बोर्डाचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र सिंग यांनी आंदोलनाची भूमिका समजून घेत थेट भूमिका घेतली. काही फेरफार केल्यानंतर ‘चल हल्ला बोल’ सिनेमाला ए प्रमाणपत्र दिले.
भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विजय आहे. या प्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे जाहीर आभार मानतो.महेश बनसोडे, निर्माता, दिग्दर्शक
‘चल हल्ला बोल’ या सिनेमाला सेन्सॉरची मान्यता मिळणे ही तर एक औपचारिकता आहे.मात्र आमची लढाई ही देशातून सेन्सॉर बोर्ड हटवणे यासाठी आहे आणि ती लढाई सेन्सॉर बोर्ड बरखास्त होईपर्यंत चालूच राहील.रवी भिलाण, सेन्सॉर बोर्डविरोधी आंदोलन नेते