मुंबई : महायुतीत आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. आमचा अजेंडा खुर्ची हा नाही, तर ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवले, त्यांची समस्या सोडविणे हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे सत्ता येते आणि जाते, पदे येतात आणि जातात. त्यासाठी मी काम करत नाही. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता होतो आणि आजही कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून मिळालेली ओळख माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असे सांगत आपण महायुतीमध्ये नाराज नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
‘पुढारी न्यूज’ चॅनलच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘महासमिट 25’मध्ये ते बोलत होते. सध्या एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज आहेत. या नाराजीमुळेच ते मंत्रिमंडळ बैठकांना गैरहजर राहात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी या चर्चांना पूर्णविराम देत महायुती सरकारचे काम टीमवर्क म्हणून सुरू असल्याचे सांगितले. कुणाच्या कामाचे श्रेय घेणे माझ्या रक्तात नाही. मला राज्यात लाडका भाऊ म्हणून नवीन ओळख मिळाल्याचा आनंद आहे. मी कधीच पातळी सोडून बोलत नाही. आरोपाला, टीकेला कामातून उत्तर देतो. म्हणून विधानसभेत 80 पैकी 60 जागा जिंकलो. कमी बोला जास्त काम करा, जास्त ऐका आणि जास्त काम करा, असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना टोला हाणला. 2014 नंतर खर्या अर्थाने विकास होऊ लागला आणि देश आर्थिक सत्तेकडे जात आहे. चांगले बोलू नका, पण वाईट तरी बोलू नका, असे म्हणत त्यांनी विरोधी पक्षाच्या टीकेवर आसूड ओढले.
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘पुढारी’ हे नावाप्रमाणे मीडियाचे ‘पुढारी’ आहे, याचा आनंद आहे. ‘पुढारी’ने प्रिंटमध्ये विश्वास निर्माण केला, स्थान निर्माण केले. आता चॅनलनेदेखील विश्वासार्हता मिळविली आहे. यामध्ये बाळासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. आता योगेश यांच्या रूपाने युवा नेतृत्व लाभले आहे. बाळासाहेबांच्या चाणाक्ष नजरेतून समाजाचे प्रश्न सुटत नाहीत, असेही सांगत त्यांनी दै. ‘पुढारी’चे कौतुक केले.
आम्ही निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरलेलो नाही. आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करणार. शेतकर्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासनही आम्ही पूर्ण करू, पण कर्जमाफी आत्ताच देणे शक्य होणार नाही. ती टप्प्याटप्प्याने केली जाईल, आम्ही स्पष्टपणे बोलणारी माणसे आहोत. सध्या आर्थिक अडचणी आहेत. पैशाचे सोंग घेता येत नाही. पण त्यावर मार्ग काढून शेतकर्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. ज्या बहिणीने आम्हाला सत्तेवर बसविले त्या बहिणींसाठी राबवत असलेली योजना सुरूच राहील. संसार चालविताना कधी कधी काटकसर करावी लागते, तशी काटकसर आम्हाला करावी लागत आहे. पण महाराष्ट्र हे एक प्रगत व मोठे राज्य आहे. त्यामुळे ही आर्थिक परिस्थिती बदलली जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.