मुंबई : सीईटी 2026 नोंदणीदरम्यान आधार आणि अपार प्रमाणीकरणाची सक्ती करून विद्यार्थ्यांना अडचणीत टाकणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अखेर माघार घेतली आहे. तांत्रिक कारणांमुळे आधार-अपार प्रमाणीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनाही आता त्याशिवाय अर्ज सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. शुक्रवारपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. सीईटी सेलला यू-टर्न घ्यावा लागला आहे.
अपार किंवा आधारमध्ये तांत्रिक अडचणी आल्या तरी सीईटी सेलने आधी कोणत्याही विद्यार्थ्यांचे अर्ज नामंजूर होणार नाहीत असा निर्वाळा दिला होता. मात्र आधार प्रणालीच्या तांत्रिक अडचणीमुळे व आधार सक्तीमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज पुढे जात नाहीत अशा तक्रारी वाढत गेल्यानंतर सीईटी प्रशासनाला भूमिका बदलावी लागली. आधार-अपार प्रमाणीकरण न झालेल्यांनाही अंतिम मुदतीअखेर अर्ज सादर करता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना सीईटी नोंदणीचा दिलासा देण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिल्याचे सीईटी सेलने सांगितले.
विद्यार्थ्यांना अडचणीत टाकणारा निर्णय आधी घेणे यामुळे सीईटी सेलच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रक्रियेत अशा प्रकारचे प्रयोग करणे योग्य आहे का, असा सवालही शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे. सीईटी कक्षाने अर्ज प्रणालीत बदल करून आधार-अपार प्रमाणीकरण न झालेल्यांनाही अर्ज सादर करण्याचा पर्याय खुला केला आहे. आधार प्रमाणीकरण ही प्राधान्याची पद्धत राहणार असली, तरी तांत्रिक अडचणींमुळे कोणताही उमेदवार सीईटी नोंदणीपासून वंचित राहणार नाही, असे कक्षाने स्पष्ट केले आहे.
तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याबाबत ‘दै. पुढारी’ने 19 जानेवारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावेळी सीईटी सेलने तातडीने पत्रकार परिषद घेऊन असे काहीच होत नाही असा दावा केला होता. मात्र राज्यभरातून यासंदर्भात अर्ज नोंदणी करत असलेल्या पालक व विद्यार्थी तक्रारी वाढत गेल्यानंतर तांत्रिक अडचण असल्याचे सांगत शुक्रवारी आधार सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला.
नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. काही विद्यार्थ्यांच्या आधार नोंदींमध्ये नावातील दुरुस्ती प्रलंबित होती. काहींच्या बायोमेट्रिक पडताळणीत हाताचे ठसे जुळत नव्हते. तर काही ठिकाणी आधार नोंदणी प्रक्रियेतील अगोदरच्या तांत्रिक अडथळ्यांमुळे प्रमाणीकरण होत नव्हते. या सर्व कारणांमुळे अपार निघत नाही यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे अर्ज अडकले. त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले.