मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या आरपीएफने मे महिन्यात ११९ प्रवाशांना विसरलेल्या ५१ लाखांच्या वस्तू परत केल्या आहेत. प्रवाशांना विसरलेले, हरवलेले सामान परत करण्यासाठी आरपीएफतर्फे 'मिशन अमानत' राबविण्यात येते.
लोकल, मेल-एक्सप्रेसमध्ये चढण्या- उतरण्याच्या घाईत प्रवासी आपले सामान विसरतात. हे सामान प्रवाशांना परत करण्याचे काम आरपीएफ करते. प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आरपीएफ महत्त्वाची भूमिका बजावते.
मध्य रेल्वेच्या आरपीएफने ऑपरेशन अमानत अंतर्गत गेल्या महिन्यात प्रवाशांच्या ५१ लाखांच्या ११९ हून अधिक प्रवाशांच्या वस्तू परत केल्या आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ११९ पैकी ६२ प्रवाशांचे २९ लाख ९२ हजारांचे सामान परत केले. त्यात बॅग, मोबाईल फोन, पर्स, लॅपटॉप आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे.