मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी १८ ऑक्टोबर रोजी उपनगरीय मेन लाईनवर ठाणे आणि कल्याण आणि हार्बर पनवेल व वाशी तसेच ट्रान्स-हार्बर लाईनवर 'मेगा ब्लॉक' घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द तसेच उशिराने धावणार आहे. त्यामुळे ऐन नवरात्रात देवीदर्शनासाठी आणि दसऱ्याच्या खरेदीसाठी रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
ठाणे आणि कल्याण ब्लॉक...
मेन लाईन ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५ व्या व ६ व्या मार्गिकेवर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबईत येणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या 'जलद' मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
त्यामुळे सर्व गाड्या १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत. यामध्ये बाहेरून मुंबईत येणाऱ्या सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस, पुणे सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, मंगळुरू एक्सप्रेस,राजगीर जनता एक्सप्रेस,काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस,बनारस सुपरफास्ट एक्सप्रेस, हावडा मुंबई मेल, हटिया एक्सप्रेस, कोयंबटूर एक्सप्रेस, नांदेड राज्यराणी एक्सप्रेस आणि चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या उशिरा पोहोचणार आहे.
तर मुंबईहून बाहेर जाणाऱ्या मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, कुर्ला एलटीटी - गोरखपुर गोदान एक्सप्रेस, कुर्ला एलटीटी जयनगर एक्सप्रेस आणि कुर्ला एलटीटी तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.
मेमू सेवांचे शॉर्ट टर्मिनेशन...
वसई रोड येथून सकाळी ०९:५० वाजता सुटणारी वसई रोड - दिवा मेमू गाडी कोपर स्थानकावरच शॉर्ट टर्मिनेट होणार आहे. तसेच दिवा येथून सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा - वसई रोड मेमू गाडी कोपर स्थानकावरून सकाळी ११.४५ वाजता सुटेल. तर दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान ही मेमू सेवा रद्द राहणार आहे.
हार्बर लाईन
पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन वगळून दोन्ही लाईनवर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे पनवेल येथून सकाळी सीएसएमटीला जाणाऱ्या आणि बेलापूर/पनवेल येथे येणाऱ्या गाड्या ब्लॉक काळात रद्द करण्यात आल्या आहेत.
ट्रान्स-हार्बर लाईन विभाग
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहणार आहेत.