मुंबई : उपनगरीय रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीकरिता रविवार, १२ जानेवारी रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत.
विद्याविहार ते ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या- सहाव्या रेल्वे मार्गावर सकाळी ८ ते दुपारी साडे बारा वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान पाचव्या - सहाव्या रेल्वे मार्गावरील मेल एक्सप्रेस अप- डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे मेल-एक्सप्रेसची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने होणार आहे. यामुळे १३२०१ पटना-एलटीटी एक्सप्रेस, १७२२१ काकीनाडा-एलटीटी एक्सप्रेस, ११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, ११०६१ एलटीटी - जयानगर पवन एक्सप्रेस, १६३४५ एलटीटी-तिरुवनंतपूरम नेत्रावती एक्सप्रेस उशिराने धावणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान अप-डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. परिणामी ठाणे ते वाशी-नेरुळ, पनवेल दरम्यानची लोकल सेवा पुर्णपणे बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल आणि नेरुळ-बेलापूर ते उरण लोकलची वाहतूर सुरु राहणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यत अप आणि डाउन जलद मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच काही बोरीवली लोकल गोरेगावपर्यंत चालविण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत