मुंबई : अभियांत्रिकी व देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवार 11 मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी सीएसएमटी ते पनवेल हार्बर मार्ग तब्बल सहा तासांपेक्षा जास्त काळ बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात काही लोकल रद्दही केल्या जाणार आहेत.
सीएसएमटी येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत सुटणार्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या थांब्यानुसार थांबतील. तर नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणार्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 वाजेपर्यंत सुटणार्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या थांब्यांनुसार थांबतील व माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने पोहचतील.
सीएसएमटी येथून सकाळी 9.48 ते सायंकाळी 4.08 पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल येथे जाणार्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार. पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते सायंकाळी 4.10 पर्यंत सीएसएमटीकरिता सुटणार्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला व पनवेल-वाशी, विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत ठाणे, वाशी, नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वे रविवारी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक घेणार आहे. त्यामुळे रविवारी चर्चगेट ते विरार दरम्यान प्रवास करणार्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. माहीम जंक्शन ते सांताक्रुझ दरम्यान ट्रॅक सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर रविवार मध्यरात्री 1 वाजल्यापासून पहाटे 4.30 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व डाउन धीम्या मार्गावरील गाड्या डाउन जलद मार्गांवर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी असल्याने या गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यामुळे या गाड्यांना लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दुहेरी थांबा देण्यात येईल. सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल, चर्चगेट दरम्यान अप धीम्या मार्गावरील गाड्या खार रोड स्थानकावर दुहेरी थांबा घेतील. आणि प्लॅटफॉर्म नसल्याने माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत.