CBSE revaluation controversy Pudhari
मुंबई

CBSE revaluation controversy: सीबीएसईच्या बारावीच्या उत्तरपत्रिकांची अदलाबदल; विद्यार्थ्यांचा आरोप

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: सीबीएसईच्या इयत्ता बारावीच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत असून, पुनर्मूल्यांकनासाठी उपलब्ध करून दिलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या हस्ताक्षराशी जुळत नसल्याचे अनेक विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांची अदलाबदली झाली असण्याची शक्यता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या ‌‘ऑन स्क्रीन मार्किंग‌’ (ओएसएम) प्रणालीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांच्या प्रती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र या प्रक्रियेत तांत्रिक विसंगती, अस्पष्ट स्कॅन प्रत, काही पाने गायब असणे आणि गुणांमधील तफावत यांसारख्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

वेदांत श्रीवास्तव या विद्यार्थ्याने ‌‘एक्स‌’ या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून भौतिकशास्त्र विषयाची उपलब्ध करून देण्यात आलेली उत्तरपत्रिका स्वतःची नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यानंतर त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. त्याला मिळालेल्या स्कॅन प्रतीतील हस्ताक्षर स्वतःच्या हस्ताक्षराशी अजिबात जुळत नसल्याचे त्याने नमूद केले आहे.

इंग्रजी आणि संगणकशास्त्र विषयांच्या उत्तरपत्रिका तसेच स्वतःच्या हस्तलिखित नोट्सशी तुलना केल्यानंतर भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकेतील अक्षररचना, अक्षरांतील अंतर, लिखाणाची शैली, तिरकेपणा आणि वाक्यरचना पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा वेदांतने केला आहे.

या प्रकरणात ओएसएम प्रणालीतील टॅगिंग आणि स्कॅनिंग प्रक्रियेचे लेखापरीक्षण करावे, मूळ उत्तरपत्रिकेची पडताळणी करावी आणि उत्तरपत्रिकांची अदलाबदली झाली का, याची चौकशी करावी, अशी मागणी त्याने केली आहे.

वेदांतप्रमाणेच संजना या विद्यार्थिनीनेही रसायनशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिकेबाबत तक्रार नोंदविली आहे. सिद्धांत परीक्षेत 70 पैकी केवळ 11 गुण मिळाल्याने धक्का बसल्यानंतर तिने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला होता. तिला मिळालेली स्कॅन प्रत सुरुवातीला अस्पष्ट वाटली; मात्र प्रत्येक पान तपासल्यानंतर त्यातील हस्ताक्षर स्वतःचे नसल्याचे तिच्या निदर्शनास आले.

मुखपृष्ठावरील वैयक्तिक माहिती स्वतःची असली, तरी आतील पाने पूर्णपणे वेगळ्या हस्ताक्षरातील असल्याचा दावा संजनाने केला आहे. यासंदर्भात तिने सीबीएसईला ई-मेल पाठवून तसेच हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचे तिने म्हटले आहे. समाजमाध्यमांवर अनेक विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारच्या तक्रारी मांडल्या आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

आयआयटी तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेणार

पुनर्मूल्यांकन प्रक्रियेबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आयआयटी-मद्रास आणि आयआयटी-कानपूर येथील तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पुनर्मूल्यांकन प्रक्रियेत नोंदविण्यात आलेल्या तांत्रिक त्रुटींची तपासणी करून सीबीएसईस अधिक पारदर्शक आणि त्रुटीमुक्त प्रणाली विकसित करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT