CBSE 10th result : वेळेआधी दहावीचा निकाल जाहीर; CBSEच्या कार्यक्षमतेची झलक File Photo
मुंबई

CBSE 10th result : वेळेआधी दहावीचा निकाल जाहीर; CBSEच्या कार्यक्षमतेची झलक

मुलींची पुन्हा बाजी; त्रिवेंद्रम विभाग अव्वल; 93.70 टक्के निकाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पारंपरिक मे महिन्याची वाट न पाहता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदा दहावीचा निकाल एप्रिलमध्येच जाहीर करत परीक्षा प्रक्रियेतील वेग आणि कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण केला. उत्तरपत्रिका तपासणीचा वेग आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे निकाल वेळेआधी जाहीर झाला असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक नियोजनासाठी अधिक वेळ उपलब्ध झाला आहे.

यंदा दहावीचा निकाल 93.70 टक्के लागला असून मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी नोंदवली आहे. विभागनिहाय निकालात पुणे विभागाने 96.66 टक्के निकालासह देशात सातवा क्रमांक पटकावला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) यंदापासून ‌‘टू बोर्ड परीक्षा‌’ धोरण लागू केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा देता येणार आहे. यंदाचा एकूण निकाल 93.70 टक्के इतका लागला असून तो गेल्या वर्षीच्या 93.66 टक्क्यांच्या तुलनेत किंचित वाढलेला आहे.

17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत देशभरात 8 हजार 75 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली होती. यंदाच्या परीक्षेत 27 हजार 339 शाळांमधील 24 लाख 17 हजार 777 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. त्यापैकी सुमारे 23 लाख 10 हजार 89 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

परीक्षेमध्ये अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर न करण्याचा निर्णय सीबीएसईने यंदाही कायम ठेवला आहे. मात्र संबंधित विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र जारी करण्यात येणार आहे.

95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 55 हजार 368 इतकी असून, हे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे. तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 21 हजार 574 इतकी असून, हे प्रमाण 8.96 टक्के इतके आहे.

विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांनी यंदा उल्लेखनीय यश मिळवले आहे. एकूण 9 हजार 443 विद्यार्थ्यांपैकी 9 हजार 88 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. विशेष गरजा असलेल्या या विद्यार्थ्यांचा निकाल 96.24 टक्के इतका लागला आहे. यातील 452 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त, तर 91 विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत.

केंद्रीय विद्यालयांचा निकाल 99.57 टक्के इतका लागला आहे. त्याखालोखाल जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल 99.42 टक्के, संलग्नित खासगी शाळांचा निकाल 93.77 टक्के, सरकारी शाळांचा निकाल 91.43 टक्के आणि अनुदानित शाळांचा निकाल 91.01 टक्के इतका लागला आहे. त्याचप्रमाणे सीबीएसईच्या परदेशामधील शाळांचा निकालही 99.10 टक्के इतका लागला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा निकाल 92.89 टक्के

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सीबीएसई संलग्न 11 शाळांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मनपा शाळांचा एकूण निकाल 92.89 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगतीची नोंद केली आहे. या परीक्षेस एकूण 339 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखली आहे.

गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमध्ये विशेष प्रगती दिसून आली असून, मराठी विषयातही अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळवले आहे. यंदाच्या निकालात मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामने हिने 97.8 टक्के गुण मिळवत मनपा शाळांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्यानंतर पूनम नगर सीबीएसई शाळेतील सौरभ यादव (97.2 टक्के) आणि राजावाडी सीबीएसई शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (97 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. तसेच पूनम नगर सीबीएसई शाळेतील आर्यन मयेकर (96.6 टक्के) आणि श्रेया सिंग (96.4 टक्के), मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (96.2 टक्के) या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक गुण मिळविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT