पुढारी ऑनलाईन डेस्क: Prakash Abitkar | अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार करा, असे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज (दि.१८) दिले. जन आरोग्य योजनेच्या आढावा बैठकीत मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना या संदर्भातील सूचना दिल्या.
अपघातग्रस्तांना तातडीने उपचार देण्यासाठी अंगीकृत आणि अन्य रुग्णालयांनी, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असेदेखील आरोग्यमंत्री आबिटकर यांनी म्हटले. पुढे त्यांनी रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत, यासाठी रुग्णालये, संस्थांनी दक्षता बाळगावी. गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रार नोंदविण्यासाठी स्वतंत्र 'मोबाईल ॲप' विकसित करण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला.
कर्करोग संशयित, निदान झालेल्या व उपचारासाठी दाखल रुग्णांची तपशीलवार यादी ठेवावी. त्यांच्या दररोजच्या तपासण्यांची माहिती अचूकपणे भरावी. जिल्हास्तरावर अधिकारी व उपसंचालक यांनी अधिनस्त संस्थांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देशदेखील आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.