मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी आणि युतीमधील जागावाटपासाठी अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या चर्चांनी रंगत आणली असली तरी अद्याप कुणीही आपल्या पदरात पडलेल्या जागांचे गणित उघड केलेले नाही. अशा परिस्थितीत मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, जागावाटपांचे सूत्र जाहीर न करता पक्षांकडून उमेदवारांना थेट एबी फॉर्म दिले गेले.
युती आणि आघाडीतील उमेदवार गुलदस्त्यात ठेवल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व आणि उमेदवारांसाठी मंगळवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे.
मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये कोणता पक्ष कोणाशी युती करणार हे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. मात्र, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागावाटपावर खलबते सुरू राहणार असल्याने जागावाटप जाहीर होऊ शकलेले नाही. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून तयारी करून बसलेल्या इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. मंगळवारी (दि.30) रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय पक्षांना अधिकृत आकडे आणि जागा जाहीर कराव्या लागणार आहेत. काँग्रेसने मात्र वंचित बहुजन आघाडीशी मैत्री करत आपले जागावाटप पूर्ण केले आहे; तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील उमेदवारांची यादी जाहीर करत महायुतीला 'हम भी तय्यार है' असे थेट आव्हान दिले आहे. मात्र, भाजप व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचबरोबर ठाकरे सेना आणि मनसे या प्रमुख पक्षांनीही आपले जागावाटप जाहीर करण्याऐवजी उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी (दि.28) रात्रीपासून ठाकरे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. आपल्यालाही उमेदवारी मिळेल या आशेने अनेक इच्छुकांनी 'मातोश्री' बाहेर गर्दी केली होती. मात्र, पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज झाले होते. त्यांनी मातोश्रीबाहेर ठिय्या दिला होता. नाराजांची समजूत काढण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागणार आहे.