मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी सुशिक्षित पीएचडी केलेल्या मध्यमवयीन नेत्याची निवड केली आहे. सिरिवेल्ला प्रसाद हे आंध्र प्रदेश तेलंगणा भागातील जमीन से जुडे कार्यकर्ते आहेत.
प्रसाद यांनी हैद्राबाद विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली आहे. एकेकाळी राहुल गांधी यांचे निकटचे सहकारी मानल्या जाणाऱ्या के. राजू यांच्या तालमीत तयार झालेल्या सिरिवेल्ला प्रसाद यांनी झारखंडमध्ये विधानसभेत मोठी आव्हाने असतानाही काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील जागा कायम ठेवण्यात यश मिळवले होते.
झारखंडमध्ये यश मिळवून दिले
झारखंडमध्ये काँग्रेस सत्ताधारी आघाडीचा भाग असून पक्षाचे १२ आमदार निवडून आले आहेत. हैदराबादमुळे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांच्याशीही सिरिवेल्ला प्रसाद यांचे उत्तम संबंध आहेत. के. सी. वेणुगोपाल हे सध्या राहुल गांधी यांचे निकटतम नेते आहेत. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढे केलेल्या या नावाला पाठिंबा दिला. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे प्रभारी असताना सिरिवेल्ला यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध आला होता.
मताधार व्यापक होण्याचा विश्वास
माजी मंत्री काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी ‘पुढारी’शी बोलताना नवे प्रभारी अत्यंत मेहनती आहेत, शारीरिक त्रासाचा किंवा मर्यादाचा विचार न करता ते सतत काम करतात. त्यांच्या नेतृत्वात पक्ष तळागाळातील मताधार अधिक व्यापक करेल, असा विश्वास व्यक्त केला.
काही दिवसांपासून काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष संघटना मजबूत करण्यास प्रारंभ केला आहे लोक चळवळीत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सहभाग घेण्याचे आदेश अद्याप दिले नसले तरी प्रत्यक्षात मतदार यादी सुधारणा या माध्यमातून काँग्रेस राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये प्रचंड मोठा संपर्क विस्तार करायच्या प्रयत्नात आहे.
जिल्हाध्यक्ष लढण्यासाठी तयार
गेले दहा दिवस झालेल्या सृजन संवाद अभियानातून काँग्रेसने जिल्हाध्यक्षांना लढण्यासाठी तयार केले आहे. सध्या सपकाळ यांच्या वतीने प्रचंड मोठ्या प्रमाणात मतदार यादी फेरनिरीक्षण कार्यक्रम राबवला जात असून डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे नातलग आणि अत्यंत कल्पक तरुण म्हणून ओळखले जाणारे अभिजीत सपकाळ या मोहिमेच्या प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. आदिवासी समाजाशी संवाद साधत काँग्रेस ही परंपरागत वोटबँक परत मिळवायचा प्रयत्न करत असताना नवे प्रभारी या वर्गाच्या जवळ जाऊ शकतील, असाही अंदाज व्यक्त केला जातो आहे.
१२३ विधानसभा मतदारसंघांत यंत्रणा मजबुतीचे प्रयत्न
१२३ विधानसभा मतदारसंघांत जिथे काँग्रेस गेल्या २५ वर्षांत एकदाही लढली नव्हती, तेथेही परिस्थिती अनुकूल असल्याने काँग्रेसने मोठ्या प्रमाणात मतदार यंत्रणा मजबूत केली असून मतदार अधिकारीही नेमले आहेत. जी पावले टाकली जात आहेत, ती काँग्रेसच्या फायद्याची ठरतील असे नमूद केले जाते आहे.
एक लाख बूथपैकी ७० हजार ठिकाणी तरुण बूथप्रमुख
भारतीय जनता पक्षाने ज्याप्रमाणे प्रत्येक बूथगणिक एक कार्यकर्ता नेमला होता तसाच त्याच धर्तीवर काँग्रेसने राज्यातील १ लाख बूथपैकी ७० हजार ठिकाणी तरुणांना बूथप्रमुख म्हणून नेमले आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणात जी पावले टाकली जात आहेत, ती काँग्रेसच्या फायद्याची ठरतील, असे नमूद केले जाते आहे.