बालकांना नवे आयुष्य देतेय कामा रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँक’  pudhari photo
मुंबई

Human milk bank Cama Hospital : बालकांना नवे आयुष्य देतेय कामा रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँक’

सहा महिन्यांत 248 लिटर दुधाचे दान, 1,461 बालकांची भागली भूक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अदिती कदम

नवजात अर्भकांना आईचे दूध अमृतासमान असते; पण काही मातांना पान्हाच फुटत नाही. त्यामुळे अर्भकांची भूक भागविण्यासाठी गायीचे दूध किंवा बेबी फूड द्यावे लागते. अशा बालकांसाठी कामा रुग्णालयातील ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्धपेढी’ वरदान ठरत आहे. या मिल्क बँकेत सहा महिन्यांत 726 मातांनी 248 लिटर दूध दान केले. या दुधावर 1,461 बालकांची भूक भागली आहे.

ज्या बालकांना आईचे दूध मिळत नाही, त्यांना या बँकेतील दूध पाजले जात आहे. त्यातून बालकांना आवश्यक पोषक तत्वे मिळत असल्याने त्यांचे आरोग्य सुधारत आहे. ज्या मातांना स्तनपान करणे शक्य होत नाही किंवा ज्या मातांना जास्त दूध येते, त्यांच्यासाठी ही बँक खूप उपयुक्त आहे. मिल्क बँकेत स्तनदा माता त्यांचे अतिरिक्त दूध दान करतात आणि ते दूध आवश्यक असलेल्या नवजात बालकांना दिले जाते. यामुळे बालकांना आईच्या दुधाचे फायदे मिळतात आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढत असल्याने ही मिल्क बॅक नवजात बालकांसाठी वरदान ठरत आहे.

प्रक्रिया केल्याने सहा महिने साठा सुरक्षित

या मिल्क बँकमध्ये माता दूधदाता (डोनर) कडून इलेक्ट्रिक ब्रेस्ट पंप मशिनद्वारे दूध घेतले जाते. ते पाश्चराईज्ड केले जाते. त्यानंतर त्या दुधाची लॅबमधून ’मायक्रो बायोलॉजिकल’ टेस्ट केली जाते. दुधाच्या गुणवत्तेनंतर आणि प्रमाणानुसार प्रत्येक मातेचे दूध काचेच्या बाटलीमध्ये मायनस 0 ते 8 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवले जाते. या बँकेमध्ये सहा महिन्यांपर्यंत दूध संकलित केले जाते. त्यासाठी मायनस 8 ते 20 डिग्री सेल्सियसनुसार डीप फ्रिजमध्ये सुरक्षित राहते. गरजेनुसार नवजात बालकांना दूध देण्यात येते.

दुधाच्या दानाचे फायदे

मातेचे दूध मिळाल्याने बालमृत्यूचे प्रमाण 14 टक्केंनी कमी होते. नवजात बालकांचा न्यूमोनिया, अतिसारासारख्या आजारांपासून बचाव होत असून सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूध मुलांचे सर्वतोपरी पोषण करते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT