ठाणे: कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि ठाणे परिसरातील शेकडो चालकांनी आपली वाहने बंद ठेवून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शासनाने निश्चित केलेले दर तात्काळ लागू करावेत अन्यथा जिल्ह्यात एकही ओला-उबेर टॅक्सी रस्त्यावर धावू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. pudhari photo
मुंबई

Cab drivers protest : कॅबचालकांचा संप सुरूच, आता बेमुदत उपोषण

चार दिवसांपासून प्रवासी सेवा विस्कळीत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : अ‍ॅप आधारित प्रवाशांना सेवा देणार्‍या कॅब चालकाचा आपल्या मागण्यांसाठी संप सुरूच आहे. दोन दिवस आंदोलन केल्यानंतर आता त्यांनी आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.

ओला, उबर आदी अ‍ॅपवर आधारित प्रवाशांना सेवा देणार्‍या टॅक्सीचालकांना प्रतिकिलोमीटर मिळणारे भाडे हे अत्यंत कमी आहे ते वाढवून मिळावे यासह इतर मागण्यांसाठी या कॅबचालकांचा संप सुरू आहे. त्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्याने तसेच नालासोपारा येथील एका कॅबचालकाने आत्महत्या केल्याने त्यांनी महाराष्ट्र कामगार सभा व भारतीय गीग कामगार मंचचे अध्यक्ष डॉ.केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. क्षीरसागर यांच्यासह निलेश भोर, सुभाष कांबळे (नवी मुंबई), रवी उमाप (पिंपरी-चिंचवड), संदीप आठवले (जि.अहिल्यानगर) हेही उपोषणाला बसले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळस्कर यांची फोर्ट येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट घेतली. त्यांच्यासमोर कॅबचालकांच्या मागण्या ठेवल्या. या मागण्यांसाठी मंगळवारी (दि.22) बैठक लावतो, असे आश्वासन दिले. कळसकर यांनी आश्वासन दिले असले तरी आझाद मैदानातील उपोषण सुरू राहणार आहे. हजार रुपयेही मागे राहत नाहीत. त्यामुळे हप्ता फेडायचा की घर चालवायचे, असा प्रश्न असल्याची व्यथा या टॅक्सी चालकांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

हप्ता फेडायचा की घर चालवायचे? कॅबचालकांची व्यथा -

पुण्यात एका खासगी कंपनीत कामाला होतो. कंपनी बंद पडल्याने चार वर्षार्ंपासून कॅब चालवतो आहे. दिवसभरातून दीड हजार रुपये मिळतात. त्यातील 800 ते 900 रुपये हे सीएनजीला जातात. हफ्ता 18 हजार रुपये आहे. त्यामुळे आर्थिक चणचण नेहमीच भासते.
सुनील बोडरे, आकुर्डी पिंपरी-चिंचवड
मी मुंबईत विमानतळ येथे प्रवाशांना सेवा देतो. ओला, उबर, रॅपिडा या कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रतिकिलोमीटर हे 8 ते 9 रुपये झाल्याने दिवसाला सरासरी 500 ते 600 रुपये मिळतात. चारितार्थ चालविणे अवघड झाले आहे. कर्जाचे हप्ते तीन महिने भरलेले नाहीत.
मंगेश शिंदे, घाटकोपर
2013 ला फेअर भाडे 216 रुपये होते. आता ते 45 रुपये मिळत होते. दिवसाला 2 हजार रुपये मिळतात. त्यातील एक हजार रुपये सीएनजीला जातात. प्रतिकिलोमीटरला 12 ते 13 रुपये मिळतात. दीड लाख रुपये कर्ज आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून व्यवसाय निम्म्यावर आला आहे.
राजाराम कनोजिया, कुर्ला (पश्चिम)
2016 पासून काम करीत आहेत. त्यावेळी दिवसाला 3,500 ते 4 हजार रुपये मिळत होते. त्यावेळी प्रतिकिलोमीटर 45 रुपये मिळायचे. दिवसाला आता 1800 ते 2 हजार रुपये मिळत आहेत. 12 तास काम करावे लागते.
विशाल गिरी, चिखली.जि.बुलडाणा
मी मुंबई विमानतळ येथे प्रवाशांना सेवा देतो. दिवसाला 1500 रुपये मिळाले तरी सीएनजीला 700 रुपये जातात. हा व्यवसाय करणे अवघड बनले आहे.
अमरपाल यादव, घाटकोपर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT