मुंबई : पुढारी वृत्तसेवा
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) यांच्यावतीने सप्टेंबर 2025 मध्ये होणार्या सीए (चार्टर्ड अकाउंटंट) परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या सर्व अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
आयसीएआयने स्पष्ट केले आहे की, 5 सप्टेंबर 2025 (शुक्रवार) रोजी ईद-ए-मिलाद या सार्वजनिक सुट्टीमुळे कोणतीही परीक्षा आयोजित केली जाणार नाही. मात्र, इतर कोणत्याही सार्वजनिक सुट्टीमुळे परीक्षेच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.
या परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै आहे. तसेच, उमेदवारांना परीक्षा केंद्र अथवा माध्यम बदलण्यासाठी 22 ते 24 जुलै दरम्यान अर्जात आवश्यक दुरुस्ती करता येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.