मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. चारचाकी वाहनांना २० रुपयांऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार असल्याने राणी बाग महागली आहे.
देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीबागेत दररोज ८ ते १० हजार पर्यटक येतात. पालिकेच्या उद्यान व प्राणिसंग्रहालयात प्रवेशद्वारातून परिसरातील दुकानदारही आपली वाहने आणून लावतात. संपूर्ण दिवसभर वाहने पार्क करून फक्त दहा ते वीस रुपये मोजतात. हे निदर्शनास आल्यामुळेच ही दरवाढ करण्यात आल्याचे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र परिसरातील दुकानदारांच्या घुसखोरीचा फटका आता पर्यटकांना बसणार आहे. राणी बागेत चौकोनी कुटुंबाला १०० रुपये तिकीट असून लहान मुलास २५ रुपये, तर प्रौढ व्यक्तीस ५० रुपये तिकीट आहे. त्यात आता पार्किंगच्या ८० रुपयांची भर पडली.
उद्यान व प्राणिसंग्रहालयाला लागून असलेल्या हेरिटेज भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या तिकीट दरातही आता वाढ करण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठी असणारे ५ रुपयांचे तिकीट दहा रुपये तर प्रौढांसाठी असणारे दहा रुपयांचे तिकीट २० रुपये करण्यात आले आहे.