धारावी; पुढारी वृत्तसेवा : रविवारी (दि. ११) धारावीमधील नव्वद फूट रोडवरील एका इमारतीला लागल्याची घटना घडली. लिफ्टलगत असलेल्या विजेच्या केबलला शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत २ महिन्याच्या चिमुरडीसह ९ जणांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील तीन लोकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
रविवारी (दि. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास धारावीतील नव्वद फूट रोडवरील शमा को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या इमारती ही घटना घडली. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील लिफ्ट लगत कन्सिल असलेल्या केबलला अचानक आग लागली. ही आग तळ मजल्यापर्यंत पसरताच शॉर्टसर्किट होऊन संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला. इमारतीमध्ये धुराचे लोट पसरू लागल्याने इमारतीमध्ये आरडाओरड सुरु झाली. रहिवाशांनी हातामधील सर्व कामे बाजूला टाकून तळमजल्याकडे धाव घेतली. तर काही कुटुंब इमारतीच्या सहाव्या मजल्यावर अडकून पडले. इमारतीमधील तरुणांनी प्रसंगावधान राखत स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. दरम्यान पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना एक तरुण भाजल्याने गंभीर जखमी झाला. पाण्याचा मारा सुरु असताना अचानक आगडोंब उसळून संपूर्ण इमारतीमध्ये धुराचे लोळ पसरल्याने एकच खळबळ माजली. अनेक रहिवासी धुरात अडकले आहेत. तर काही पायऱ्यांवर कोलमडून पडले होते. इमारतीमधील तरुणांनी तात्काळ त्यांना उचलून इमारती बाहेर आणून त्यांच्या नातेवाईकांच्या हवाली केले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार इंजिन घटनास्थळी दाखल झाले. लागलीच अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीमध्ये प्रवेश केला. मात्र धुराचे लोट पसरल्याने मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला. अशा परिस्थितीत इमारतीमध्ये अडकलेल्या कुटुंबाला अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घराबाहेर काढून त्यांना शिव रुग्णालयात हलविले. मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत बोलताना अग्निशमन दलाचे अधिकारी म्हणाले, आग लेव्हल १ ची असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एक जण किरकोळ भाजला तर एक चिमुरडी व नऊ जणांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना शिव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचे त्यांनी सांगितले.