मुंबई ः राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चौथ्या फेरीसाठी विद्यार्थी 28 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 4 अॅाक्टोबर रोजी चौथी यादी जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 10 अॅाक्टोबरपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.
सीईटी कक्षातर्फे बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 7 आणि 8 एप्रिल रोजी घेतली होती. या परीक्षेचा निकाल 15 मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर तब्बल दोन महिने उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. त्यानंतर सीईटी कक्षाने ही प्रवेश प्रक्रिया 25 जुलैला सुरू केली होती. या अभ्यासक्रमाची तिसरी फेरी 15 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा थांबवली.
तिसर्या फेरीपर्यंत अर्ज दाखल केलेल्या 14 हजार 167 विद्यार्थ्यांपैकी 9 हजार 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता चौथ्या फेरीसाठी 6 हजार 735 जागा उपलब्ध असून 5 हजार 142 विद्यार्थी शिल्लक आहेत. या फेरीसाठी इंडियन नर्सिंग कौन्सिलने पर्सेंटाइलची अट शिथिल करण्यास मंजुरी दिली असून या चौथ्या फेरीसाठी भौतिकशास्त्र विषयात 45 टक्के गुणांची अट असणार आहे.
असे आहे वेळापत्रक
23 ते 28 सप्टेंबर ः अर्ज नोंदणी व शुल्क भरणा
29 सप्टेंबर ः उपलब्ध जागांची यादी
29 सप्टेंबर ते 01 अॅाक्टोबर ः महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम भरणे
04 अॅाक्टोबर ः चौथी गुणवत्ता यादी
05 ते 10 अॅाक्टोबर ः प्रत्यक्ष महाविद्यालयांत जाऊन प्रवेश घेणे