मुंबईतील आगी विझवण्यासाठी ब्रिटिश काळात लाल रंगाचे १० हजार ८४३ फायर हायड्रेट म्हणजेच 'बंब' अतिक्रमणाखाली गडप झाले आहेत.  Pudhari News Network
मुंबई

British-era Fire Extinguisher : मुंबई शहरातील ब्रिटिशकालीन 'बंब' अतिक्रमणाखाली गडप

10 हजार 843 पैकी 1,353 कार्यरत, अग्निसुरक्षेवर प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्दे

  • ब्रिटिश काळात लाल रंगाचे १० हजार ८४३ फायर हायड्रेट म्हणजेच 'बंब' बसविण्यात आले

  • सध्या मुंबईत १ हजार ३५३ बंब कार्यरत

  • वर्षभरात मुंबईत ४ हजार २०० हून अधिक आगीच्या घटना घडल्या; अग्निसुरक्षेवर प्रश्न उपस्थित

मुंबई : मुंबईतील आगी विझवण्यासाठी ब्रिटिश काळात लाल रंगाचे १० हजार ८४३ फायर हायड्रेट म्हणजेच 'बंब' बसविण्यात आले होते. मात्र हे 'बंब' अतिक्रमणाखाली गडप झाले आहेत. सध्या मुंबईत १ हजार ३५३ बंब कार्यरत आहेत. त्यामुळे मुंबईतील अग्निसुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१९ मध्ये विधानसभा लेखा समितीने हायड्रंट बंब पुनर्जीवित करण्याची शिफारस केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. होत आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत ४ हजार २०० हून अधिक आगीच्या घटना घडल्या असून यात १६ जणांचा मृत्यू झाला आणि १२७ जण जखमी झाले आहेत. झोपडपट्ट्या, बाजारपेठा आणि गगनचुंबी इमारतींत घटना घडत आहेत.

टँकरवरच जास्त भर

प्रत्येक १५० मीटर अंतरावर फायर हायड्रेट बसवण्याची ब्रिटिश काळातील योजना होती. मात्र आज रस्त्यावर किंवा फुटपाथवर कुठेही हे बंब सहज नजरेस पडत नाहीत. मुंबई फायर ब्रिगेडने आपत्कालीन परिस्थितीत वापरता येतील अशा ६१ ठिकाणांची ओळख पटवली असली तरी, आगीच्या घटनांच्या तुलनेत ही संख्या अपुरी आहे. २०१९ मध्ये विधानसभा लेखा समितीने हायड्रंट पुनर्जीवित करण्याची शिफारस केली होती. मात्र प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. २०११ मध्ये बांद्रा येथील गरीब नगरात, २०१२ मध्ये मंत्रालयात, २०१४ मध्ये अंधेरीतील लोटस नीलकमलमध्ये आणि २०२१ मध्ये भांडुप ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीच्या वेळी पाण्याचे टँकर वेळेत न आल्याने ही गरज आधोरेखीत झाली आहे. त्यामुळे हे बंब पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र अग्निशमन विभागाचे माजी संचालक एम. व्ही. देशमुख यांनी सांगितले. सध्या टँकरवरच जास्त भर आहे. हायड्रंटबाबत काय करायचे, याचा निर्णय पालिकेला घ्यावा लागेल, असे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले.

मुंबईतील संवेदनशील ठिकाणे अशी...

शहरातील भुलेश्वर, भिंडी बाजार, धारावी, कुर्ला, गोवंडी, अंधेरी, जोगेश्वरी आदी भाग आगींच्या बाबतीत संवेदनशील आहेत. येथील अरुंद रस्ते, अवैध पार्किंग आणि अतिक्रमणामुळे दमकल गाड्या घटनास्थळी पोहोचणे कठीण होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जुन्या बंबांना कार्यरत करणे, अवैध पार्किंग हटवणे आणि गर्दीच्या वस्त्यांत मोकळ्या रस्त्यांची सोय करणे हाच पर्याय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT