मुंबई : पालिकेच्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड संचालक मंडळ निवडणुकीच्या निकालात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
मतमोजणी दरम्यान उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकार्यांनी निकालात अनियमितता, गैरव्यवहार केल्याचा आरोप जय सहकार पॅनेलने केला होता. त्या विरोधात त्यांनी को ऑपरेटिव्ह न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याची अंतिम सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे. या सुनवणीकडे पालिकेच्या कर्मचार्यांचे लक्ष लागले आहे.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड संचालक मंडळ निवडणुक 21 ऑगस्टला संपन्न झाली. मागील दहा वर्षे वर्चस्व असलेल्या जय सहकार पॅनलचे 19 पैकी 6 उमेदवार निवडून आले होते तर सहकार पॅनेलचे 13 उमेदवार विजयी झाले. मतमोजणी दरम्यान वारंवार आक्षेप घेऊनही उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. फेर मतमोजणीची मागणी करूनही नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी उपनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करून पत्रकार परिषदेत को ऑपरेटिव्ह न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी को ऑपरेटिव्ह न्यायालयात धाव घेतली असून त्याची अंतिम सुनावणी 9 सप्टेंबरला होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून फेरमतमोजणीची मागणी मान्य केल्यास विद्यमान विजयी संचालकांची डोकेदुखी वाढणार आहे.