लग्नाचे वचन मोडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नव्हे !   File Photo
मुंबई

लग्नाचे वचन मोडणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नव्हे! न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

Mumbai News | आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर

पुढारी वृत्तसेवा

मुंबईः पुढारी वृत्तसेवा

प्रेमसंबंधात लग्न करण्याचे दिलेले वचन कालांतराने मोडणे हा काही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा देत सत्र न्यायालयाने एका प्रकरणातील आरोपी तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अनेकदा प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या आत्महत्या प्रकरणांत लग्नाचे वचन मोडून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातो. मात्र हा आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक हेतूच नसतो, असे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण आर. नवंदर यांनी जामीन देताना स्पष्ट केले.

मुंबईतील आत्महत्या केलेल्या महिलेची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी तरुणाशी ओळख झाली होती. नंतर त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेमभावना निर्माण झाली. अनेक भेटींनंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवले होते. तसेच तरुणाने महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे वचनही दिले होते. कालांतराने त्या तरुणाचे इतर महिलांशीही संबंध असल्याचे आत्महत्या केलेल्या महिलेला कळले. त्या महिलांनाही तरुणाने लग्नाचे वचन दिले होते. यातून वादावादी झाल्यानंतर तरुण या महिलेशी बोलणे टाळू लागला. त्यामुळे ही महिला निराश झाली होती. याच नैराश्यातून महिलेने अखेर ३ डिसेंबर २०२४ रोजी आत्महत्या करून स्वतःचे जीवन संपवले. पोलिसांनी या तरुणाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तरूणाने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यावर सरकारी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला होता. अर्जदार तरुणाचे आत्महत्या केलेल्या महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र त्या तरुणाच्या अनैतिक कृत्यांमुळे महिलेला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत तरुणाचे कृत्य आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. तरुणाच्या वकिलांनी मात्र आरोपाचे खंडन केले. महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा हेतूच नव्हता, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तरुणाला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT